खारेपाटण – गगनबावडा राज्यमार्गाचे काम निकृष्ट

वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख यांची कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार

अन्यथा वैभववाडी मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा दिला इशारा

खारेपाटण, तिथवली, भुईबावडा ते गगनबावडा राज्य मार्ग- 171 चे काम मार्च 2023 च्या बजेट मध्ये मंजुर झालेले होते. सदर मंजूर कामाची लांबी सुमोर 5 कि.मी. होती. या कामासाठी 3 कोटी 48 लाख एवढा निधी मंजुर झाला होता. ज्या ठेकेदाराला हे काम मिळाले होते त्या ठेकेदाराने मे 2023 मध्येच हे काम सुरु करुन जवळ-जवळ पुर्ण बीएम व सीलकोट सुध्दा पुर्ण केले होते. परंतु काम केल्यानंतर महिन्याभराच्या आतच हे काम सद्यस्थितीत खड्डे पडुन पुर्णपणे उखडलेले आहे. या निकृष्ट झालेल्या कामाला जबाबदार आपले सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. अशी तक्रार वैभववाडी शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. ह्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, गेली अनेक वर्षे आपल्या खात्यामार्फत होणा-या करोडो रुपयेच्या कामांच्या फक्त निविदा लावल्या जातात. प्रत्यक्षात काही ठिकाणांचे काम मात्र लाखोंच्या घरातच केले जाते. आपल्या विभागाकडुन सदर ठेकेदारांना अभय असल्यामूळेच अशा प्रकारची जाणून बुजुन निकृष्ट दर्जाची कामे वैभववाडी तालुक्यातच होत आहेत. सदर रस्ता हा गेली अनेक वर्षे नादुरुस्त झाला होता. या पंचक्रोशीतील लोकांची व वाहनधारकांची दररोज तालुक्यात ये-जा चालु असते.
सदर काम ब-याच वर्षानंतर मंजुर झाल्यामूळे येथील वाहनधारकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. परंतु सदरच्या ठेकेदाराने हे काम पुर्णपणे निकृष्ट केल्यामूळे त्याचा त्रास भुईबावडा पंचक्रोशीतील व वैभववाडी तालुक्यातील निष्पाप जनतेला सहन करावा लागत आहे. विभाग मात्र याकडे पुर्णत: डोळेझाक करून आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी पदाधिकारीच बेनामी ठेकेदार झाल्यामुळे व त्यांच्या लोकप्रतिनिधींचेच वरदस्त असल्यामूळे आपल्या विभागाकडून वारंवार बोगस कामे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाची कामे करु देणार नाही. तसेच सदर काम संबंधित ठेकेदाराकडुन पन्हा नव्याने पुर्ण करुन घेतल्या शिवाय सदर ठेकेदाराला या कामाचे देयक देण्यात येवु नये. तसे न केल्यास वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने लवकरच आपल्याला या कामाचा जाब विचारण्यासाठी या रस्त्यावर सर्वसामान्य जनतेला व वाहनधारकांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

वैभववाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!