कणकवली भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा

उपकार्यकारी अभियंत्यांना कार्यालयात घेराव
फोंडाघाट व तरंदळे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपा आक्रमक
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील या वर्षीच नव्याने केलेल्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच सदरचा रस्ता हा घाटामधून जात असल्याने पावसाळ्याच्या कालावधीमध्ये धुके पडलेले असते. अशावेळी रस्त्याच्या बाजूला कॅट आय बसविण्यात आलेले नाहीत व थर्मोप्लास्टिक पेंट रोड मार्किंग सुद्धा केलेले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी सदर नव्याने केलेल्या रस्त्यावरील पडलेल्या खड्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. तसेच तरंदळे धरणाजवळील रस्त्याचा भाग अत्यंत खराब झाला असून हे काम देखील निकृष्ट झाले आहे. त्यामुळे या कामाची देखील चौकशी व्हावी व त्याचे लेखी उत्तर आम्हाला कळवावे. नादुरूस्त रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुस्थितीत न झाल्यास व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा कणकवली तालुका भाजपच्या वतीने देण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक शिषिर परुळेकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, निखिल आचरेकर, अभय गावकर, सुदर्शन नाईक, विजय चिंदरकर, सुभाष मालडकर, सदा चव्हाण, उमेश घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर / कणकवली