सर्वांना सोबत घेऊन प्राधान्यक्रम ठरवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करणार – नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी : विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून सर्वांना सोबत घेऊन आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी अनौपचारिकरित्या सांगितले.
श्री. तावडे यांनी आजच सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर निवृत्त माहिती उपसंचालक आणि ‘घुंगुरकाठी’ स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी आज श्री. तावडे यांची सदिच्छाभेट घेतली. यावेळी श्री. लळीत यांनी आपले ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
नूतन जिल्हाधिकारी श्री. तावडे यांच्याशी चर्चा करताना श्री. लळीत यांनी पर्यटन विकास, पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या, कातळशिल्पांचे संरक्षण, आडाळी एमआयडीसी क्षेत्राचा विकास, अन्य पायाभूत सुविधा याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी श्री. तावडे यांनी आपण सर्वसामान्य नागरिकाचे हित नजरेसमोर ठेवून काम करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, विकासाचा प्राधान्यक्रम ठरवून सर्व घटकांच्या समन्वयाने काम करणार, असे सांगितले. सिंधुदुर्ग हा वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा असून येथील जनता विकासाभिमुख आहे. त्यामुळे येथे काम करताना मला विशेष समाधान वाटते, असे ते म्हणाले. श्री. तावडे यांनी यापूर्वी सिंधुदुर्गचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.