आडाळी शाळेतील मुलांनी बनवल्या राख्या आणि नागमूर्ती

सृजनाशिलतेला वाव: ग्लोब ट्रस्ट आणि शाळेची संकल्पना
शालेय जीवनातच सृजशीलतेचा संस्कार मुलांवर होण्याच्या उद्देशाने आडाळी प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सरपंच पराग गांवकर यांच्या संकल्पनेतून मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडली. तर मुख्याध्यापक सायली देसाई यांनी राखी बनविण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले.
पराग गांवकर यांच्या “ग्लोब ट्रस्ट” च्या माध्यमातून आडाळी प्राथमिक शाळेच्या स्वयंसेवक शिक्षक दर्शना केसरकर व उमेश बोर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मातीकाम कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुलांच्या हातात चिकण मातीचे गोळे देऊन नागाची मूर्ती बनविण्यास सांगण्यात आले. यावेळी मुलांनी स्वतःच्या संकल्पनेतून त्यांच्या मनातील नागमूर्ती साकारल्या. यावेळी पुणे येथील लेखक केशव वाघमारे व घुंगूरकाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘आजच्या शिक्षण पद्धतीमुळे मुलांच्या सर्जनशिलतेला वाव मिळत नाही. अशावेळी आपल्या गावची शाळा सृजनशिलतेचा संस्कार करणारे केंद्र बनविण्याचा सरपंच, पालक व शिक्षकांचा विचारच खूप कौतुकास्पद आहे, असे उद्गगार श्री. वाघमारे यांनी काढले.
श्रीमती देसाई यांच्या संकल्पनेतून राखी बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी धागा व मणी यांचा वापर करून विविध प्रकारच्या राख्या मुलांनी बनविल्या. नंतर राख्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. पालक व ग्रामस्थानी त्याला उस्फूर्त प्रतिसाद देत मुलांचे कौतुक केले.
दोडामार्ग l प्रतिनिधी





