८१ वर्षांच्या निराधार वयोवृध्दाला सांताक्रुजमधील कार्व्हर डे नाईट शेल्टरचा आधार
जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते घेताहेत वसंत अंबालाल चांदेग्रा…या आजोबांची काळजी
सांताक्रुज,मुंबईःआपल्या माणसांच्या समाजात आपल्या आजुबाजुला काही अत्यंत माणसं साधी असतात.अबोल असतात.त्यांच्या आयुष्यात शांतपणे स्वतःचं काम करीत ती जगत असतात….अशीच एक व्यक्ती म्हणजे वसंत शांतीलाल चांदेग्रा वय वर्षे.८१.
अविवाहित आणि मुंबईत स्वतःचे कुटुंब, घरदार नसलेल्या व निराधार असलेल्या वसंत चांदेग्रांची उभी हयात …म्हणजे वयाची जवळपास ६२ वर्षे सांताक्रुजच्या परिसरात छोटी मोठी कामं करण्यात गेली. सांताक्रुज परिसरातील अनेक गुजराती बांधव त्यांना ओळखतात.
सुरूवातीला वसंत कुठल्याशा पब मधे काम करायचे….त्यानंतर ते जगण्यासाठी रस्त्यावर रूमाल विकू लागले….अधिक थकल्यावर वजनकाटा घेवून बसायचे…सद्या ते सांताक्रुजच्या राधाकृष्ण स्वीटसमोर दुकानाबाहेरच्या फळकुटावरच राहायचे. तीथले दुकानदार-व्यापारी जे काही पोटासाठी देत त्यावर गुजराण करायचे…वयोवृध्द निराधार असलेले वसंत भाजीवाल्यांना चहा आणू देणे, सुट्टे पैसे आणून देणे अशी कामं करायचे…आणि तीथंच राहायचे.
सांताक्रुजच्या परिसरात रस्त्यावरील निराधार वयोवृध्दांसाठी जीवन आनंद संस्थेचे कार्व्हर डे नाईट शेल्टर गेली १० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. सद्यस्थीतीत मुंबईमहानगर पालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय नागरी बेघर निवारा केंद्र या योजनेअंतर्गत हे शेल्टर होम सुरू आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी जीवन प्रवासात वयोमानाने शरीराने थकलेल्या वसंत चांदेग्रा या वयोवृध्द आजोबांना आधार आणि निवा-यासाठी नुकतेच दाखल केले असल्याची माहिती शेल्टर होमच्या इन्चार्ज संपदा सुर्वे यांनी दिली आहे.जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते वसंत चांदेग्रांची काळजी घेत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते संदिप परब हे संस्थापक असलेल्या जीवन आनंद संस्थेच्या मुंबई,विरारफाटा कुडाळ-सिंधुदुर्ग सह गोवा राज्यातील आश्रम आणि शेल्टर होममधे देशभरातूनआलेले व दाखल असलेले अनेक बांधव असतात. स्वतःच्या कुटुंबापासून हरवलेल्या-दुरावलेल्या या निराधार बांधवांचे कुटुंबिय शोधून त्यांचे पुनर्मिलन करण्यामधे कार्व्हर डे नाईट शेल्टर केंद्राची आजवर नेहमीच मध्यवर्ती भुमिका राहिलेली आहे.
किसन चौरे,ब्यूरो न्यूज, कोकण नाऊ