कोकणातील गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वेकडे इंजिनासह बोगीची कमतरता

दुपदरीकरण तातडीने करावे
एसटीने प्रवाश्यांच्या मागणीनुसार उपनगरांतुन गाड्या सोडाव्यात – मोहन केळुसकर
कणकवली:-
गणेशोत्सवाचा वेध लागलेल्या चाकरमान्यांनी भल्या पहाटेपासून आरक्षणासाठी प्रयत्न सुरू केलेत. पण अवघ्या काही मिनिटभरात आरक्षणासाठी प्रतिक्षा यादी दिसू लागली. त्यात काय गोलमाल आहे ते चौकशी अंती समजेल. मात्र सद्य परिस्थितीत भारतीय रेल्वे कडे इंजिनासह बोगींची कमतरता आहे. कोकण रेल्वे ही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने दक्षिणोत्तर जोडणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.
विद्यमान परिस्थितीत एसटी महामंडळाने गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई उपनगरातील भागाभागांतून एसटीच्या फेर्या सुरू कराव्यात. त्यामुळे खाजगी गाड्यांच्या मनमानी तिकीट वाढीला आळा बसेल, असेही मत केळुसकर यांनी व्यक्त केले आहे.
कोविआची बैठक दादर-मुंबई कार्यालयात झाली. त्यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी पदाधिकारी एकनाथ दळवी, भाऊसाहेब परब, सूर्यकांत पावसकर, मनोहर डोंगरे, रमाकांत जाधव, चंद्रकांत आम्रे, राजन केळुसकर, संतोष दळवी, प्रकाश तावडे आदी उपस्थित होते