कवठी जिल्हा परिषद शाळेत उद्या संगणक कक्ष, वाचनालयाचे उद्घाटन

जि. प. उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल यांच्या हस्ते होणार उद्घाटन
विविध मान्यवरांची उपस्थिती
कवठी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कवठी नं. १ मध्ये नूतन संगणक कक्ष आणि वाचनालय कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्ही सुविधांचा उद्घाटन सोहळा सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य केशव ऊर्फ दीपक नारकर, रूपेश पावसकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, पंचायत समिती सदस्य अर्चना बंगे, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, कवठीच्या सरपंच स्वाती करलकर, उपसरपंच ऋतुजा खडपकर, संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत सुरेश केरवडेकर, चेंदवण हायस्कूलचे मुख्याध्यापक माणिक पवार, कवठी युवक मित्रमंडळ मुंबईचे अध्यक्ष संजय करलकर, विस्तार अधिकारी स्वप्नाली वारंग, केंद्रप्रमुख संतोष वारंग आणि ग्रामविकास अधिकारी नितेश तांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शाळेत उपलब्ध होणाऱ्या या नव्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. संगणक कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन संगणकीय ज्ञान संपादन करता येणार आहे. तर वाचनालयामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासह ज्ञानवृद्धी आणि स्वअध्ययनाची सवय विकसित होण्यास मदत होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र दत्ताराम करलकर, मुख्याध्यापक राजेश बाबू परब, उपशिक्षिका प्रिती प्रदीप नारकर, उपशिक्षक मंगेश कमलाकर पालवे तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शालेय भौतिक सुविधा व विद्यार्थी सुरक्षा विकास समिती, सखी सावित्री समिती आणि शालेय स्वास्थ्य सभा यांच्या वतीने करण्यात आले आहे.






