शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन फिरणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रांचा वापर करुन प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या अवयवांची विक्री आणि तस्करी करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आदेश दिले होते. सदर आदेशाच्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांची पथके तयार करुन अवैध अग्निशस्त्रांसह ४ इसमांना जेरबंद केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक संदिप भोसले स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांची पथके तयार करुन सिंधुदुर्ग जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांना पांग्रड येथील जंगलात कुडाळ येथील काही इसम कार आणि मोटारसायकलने जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी कडावल बाजारपेठेत सापळा रचून पहाटे ५:४५ वाजाता पांग्रडवरुन कुडाळकडे जाणारी एक सफेद कार आणि एक मोटारसायकल थांबवून तपासणी करुन त्यामधील अजित लाडोबा तांबे (वय ५५ वर्षे, रा. वक्रतुंड कॉम्पेक्स, कुडाळ), दत्ताराम संभाजी परब (वय ५० वर्षे, रा. वक्रतुंड संकुल, लक्षीवाडी, कुडाळ), सिध्देश सुरेश गावडे (वय २४ वर्षे, रा. अणसूर, टेंबवाडी, वेंगुर्ला), नारायण प्रकाश राउळ, (वय- १९ वर्षे, रा. तेंडोली, खरातवाडी, कुडाळ ) यांच्या ताब्यातून दोन काडतूसे बंदुका आणि १३ जिवंत काडतुसे हस्तगत केली. सदर इसमांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ सह कलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी, कुडाळ