गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज

वाहतूक व विसर्जन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन

अवजड वाहनांना प्रवेशबंदी ; पर्यायी मार्गाने डंपर वाहतूक

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, गणेश विसर्जन, आरोग्य सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कुडाळ नगरपंचायतीने व्यापक नियोजन केले आहे. नगराध्यक्ष प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या समन्वय बैठकीत विविध विभागांच्या सहकार्याने गणेशोत्सव कालावधीतील उपाययोजनांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
७ ते २५ सप्टेंबरदरम्यान हॉटेल अभिमन्यू ते काळप नाका एसटी डेपोपर्यंतचा नगरपंचायतीचा रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवण्यात येणार असून या मार्गावर व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास सक्त मनाई राहणार आहे. गणेशमूर्ती व गणेशोत्सव साहित्य विक्रीसाठी १२ व १३ सप्टेंबर रोजी पोस्टाजवळ आणि नगरपंचायत पटांगणात विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नार्वेकर बेकरी ते भाट बिल्डिंग परिसर, नगरपंचायत पटांगण आणि भाजीमार्केट येथे किरकोळ पथविक्रेत्यांना व्यापाराची मुभा राहणार आहे.

लक्झरी बसेससाठी प्रवेशबंदी

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कुडाळ-पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या खासगी व लक्झरी बसेसना हॉटेल अभिमन्यू ते काळप नाका या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या बसेसची वाहतूक महामार्गावरूनच सुरू राहणार आहे. प्रवाशांच्या चढ-उतारासाठी काळप नाका, सत्यम हॉटेल आणि आर.एस.एन. हॉटेल येथे व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डंपर वाहतुकीला पर्यायी मार्ग

७ ते २५ सप्टेंबरदरम्यान मालवण-कुडाळ मार्गावरील अवजड डंपर वाहतूक बंद ठेवून ती मालवण-नेरुर (जकात)-एमआयडीसी कुडाळ या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मुख्य बाजारपेठेत अवजड व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अनंत मुक्ताई हॉटेलसमोरील मोकळी जागा व दिवाणी न्यायालय परिसरात चारचाकी वाहनांसाठी, तर जिजामाता चौक ते नक्षत्र टॉवर या मार्गावर दुचाकी वाहनांसाठी सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. पुष्पा हॉटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर नो-पार्किंग झोन निश्चित केला जाणार असून रिक्षांसाठी सिंगल लाईन व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.

१० गणेशघाटांवर सुविधा

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील १० गणेशघाटांवर मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपक, स्वच्छता आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. विसर्जनावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापुरुष गणेशघाट, गुलमोहर शेजारील गणेशघाट आणि सांगिर्डेवाडी गणेशघाट येथे मगरीचा वावर लक्षात घेऊन वन विभागाच्या वनरक्षकांची नियुक्ती करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
सर्व गणेशघाटांवर प्रथमोपचार पेटी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे व खराब रस्त्यांची दुरुस्ती, हायमास्ट दिव्यांची देखभाल तसेच धोकादायक विद्युत तारांची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

बिनपरवाना होर्डिंग्जवर कारवाई

गणेशोत्सव काळात शहराचे सौंदर्य आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी नगरपंचायतीची पूर्वपरवानगी न घेता होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स, जाहिरात फलक किंवा कमानी लावण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगीशिवाय लावलेले जाहिरात साहित्य नगरपंचायतीमार्फत हटविण्यात येऊन संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत

गणेशोत्सव काळात नागरिकांच्या तक्रारी तसेच आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत राहणार आहे. गणेशघाटांवर नोडल अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहतूक, पार्किंग व विसर्जन व्यवस्थेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
या बैठकीस उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी खंडू पवळ, नगरसेवक विलास कुडाळकर, नयना मांजरेकर, श्रृती वर्दम, आफरिन करोल यांच्यासह महसूल, सार्वजनिक बांधकाम, वीज, पोलीस, वाहतूक, वन, आरोग्य, एसटी, परिवहन विभाग, व्यापारी संघटना, डंपर चालक-मालक संघटना, रिक्षा चालक संघटना तसेच नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!