वेताळ बांबर्डेत भीषण आग लागून लाखोंचे नुकसान

गडकरीवाडी-वाघभाटले येथील घटना

कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरीवाडी-वाघभाटलेवाडी येथे आज काजू, नारळ तसेच राहत्या घराला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. सदर आग आज, शनिवार दुपारी ३.१५ च्या सुमारास लागली. या भीषण आगीमध्ये गडकरीवाडी येथील चंद्रकांत महादेव गायकवाड यांच्या काजू, नारळ बागेचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये अंदाजे ४५ काजू कलमे जळून खाक झाली.
तर गडकरीवाडी येथील राहणारे दीपक पुरुषोत्तम बांबर्डेकर यांच्या राहत्या घराला ही भीषण आग लागून लाकडी सामान, पत्रे, खुर्च्या, लाईट फिटिंग यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच गडकरीवाडी विठ्ठल भगवान पार्टे यांच्या शेतातील गोवर जळून १० हजार तर अरविंद बाळकृष्ण डांगे यांच्या शेतातील गोवर जळून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच रवींद्र बाबू गावडे यांचे या भीषण आगीत गवत जळून १५ हजारांचे नुकसान झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून सदर आग विझवण्यात यश मिळवले. सदर आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, पोलीस पाटील दिपाली भोगले, ग्रामपंचायत सदस्य साजूराम नाईक, देवेंद्र सामंत, राजू यादव यांनी भेट देवून झालेल्या नुकसानाची पाहणी केली. या भीषण आगीत ४ लाख ८० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!