विजयदुर्ग बंदरात संशयास्पद जहाज
जहाजावर पाकिस्तानी नागरिक असल्याच्या चर्चांना उधाण ?, विजयदुर्ग जेटीवरून आखाती देशासाठी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक ?
सिंधुदुर्ग ; मागील दोन दिवस विजयदुर्ग बंदरात ‘एमएसव्ही अलरशीद’ नावाचे जहाज आलेले होते. हे जहाज कशासाठी आले हे संशयास्पदरित्या या जहाजावरून कोणी आले तर नाहीत ना अशीही चर्चा दोन दिवस विजयदुर्ग परिसरात होती. काल गुजरात पासिंगचे जवळपास १४/१५ मोठे मालवाहक ट्रक विजयदुर्ग जेटीवर दाखल झाले होते. त्यानंतर ही बोट जेटीवर आणण्यात आली आणि त्यानंतर थेट या ट्रकमधील जनावरे या बोटीवर चढविण्यात आली. त्यानंतर तत्काळ ही बोट रवाना झाली.
पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी ही बोट रीतसर परवानगी घेऊन विजयदुर्ग बंदरात आली होती आणि त्यावर संशयास्पद असे काही नव्हते असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले असेल तर काही प्रश्न उपस्थित होतात. हे जहाज कशासाठी आले याबाबत स्थानिक बंदर अधिकाऱ्यांना माहित होती त्यांनी पोलीस यंत्रणेला याबाबत काही माहिती दिली होती का? पोलिसांनी कोणती कागदपत्रे तपासली होती का ? विजयदुर्ग बंदरातून कोणत्याही प्रकारच्या जनावरांच्या वाहतुकीला परवानगी आहे का याची माहिती घेतली आहे का? या बोटीतून शेळ्या गुजरातकडे रवाना झाले असतील तर गुजरात पासिंगच्या ट्रकमधून म्हणजेच गुजरातवरून आलेल्या जनावरांची पुन्हा गुजरातकडे रवानगी कशी? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
या जेटीवरून झालेली जनावरांची वाहतूक ही कोणाच्या परवानगीने आणि कोणत्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाली याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणावर विविध चेकपोस्ट पार करीत जनावरांची वाहतूक होते. एका आड बाजूला असलेल्या जेटीवरून बिनधास्तपणे परदेशात वाहतूक केली जाते?
लाईव्ह स्टॉक नेण्याची परवानगी नसलेल्या जेटीवरून उघडपणे जनावरांची वाहतूक होऊन सुद्धा जिल्हा प्रशासनाला पूर्णपणे अंधारात ठेवले गेले आहे काय असा सवाल उपस्थित होत आहे. १५/१६ ट्रकमधून नक्की काय काय आणले गेले आणि बोटीतून पाठविले याची माहिती जिल्हा प्रशासनाला आहे का?
खरोखरच या वाहतुकीला कस्टम आणि बंदर विभागाची परवानगी होती का? या बोटीतून किती संख्येने आणि कोणत्या जनावरांची वाहतूक नक्की कोणत्या देशात पाठविली गेली याची माहिती जिल्हा प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. लाईव्ह स्टॉक वाहतुकीची परवानगी नसलेल्या जेटीवरून जनावरांची वाहतूक करून संबंधित विभागाची फसवणूक करून महसूल चोरी तर केली गेली नाही ना?
मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत येत असलेल्या या जेटीवरून कोणत्याही प्रकारच्या जनावरांच्या वाहतुकीला देशांतर्गत किंवा विदेशात पाठविण्याची परवानगीच नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सध्या दोन महिन्यासाठी या जेटी वरून प्रायोगिक तत्त्वावर मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. मात्र, कोणत्याही प्रकारचा लाईव्ह स्टॉक (जनावरांच्या) वाहतुकीची परवानगी नसल्याचे वृत्त आहे. अशाप्रकारची कोणतीच परवानगी नसताना या जेटीवरून आखाती देशात जनावरांची तस्करी तर सुरू झाली नाही ना? यासंदर्भात महसूल गुप्तचर संचनालयाकडे तक्रार होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
प्रतिनिधी, सिंधुदुर्ग