विकास आराखड्याबाबतचे ‘ते’ वृत्त वस्तुस्थितीस धरून नाहीत – प्राजक्ता बांदेकर

नगरपंचायत विकास आराखड्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये “विकास आराखड्याबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची” बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या बातमीतील माहिती वस्तुस्थितीस धरून नसल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी म्हटले आहे.
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कुडाळ शहराचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदर विकास आराखड्याबाबत नागरिकांकडून 8 जुलै 2026 पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. दिनांक 22/06/2026 रोजी काही प्रसारमाध्यमांमध्ये “विकास आराखड्याबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची” बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या बातमीतील माहिती वस्तुस्थितीस धरून नसून याबाबत पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
मुख्याधिकारी यांचेमार्फत हरकती व सुचना सादर करणेसाठी विविध वर्तमान पत्राद्वारे प्रेस नोट देऊन आवाहन करण्यात आले आहे. तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या कार्यालयात प्रारुप विकास आराखडा नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यासोबत आरक्षण, आरक्षण क्रमांक, आरक्षणाचे क्षेत्र, सर्व्हे क्रमांक याबाबत माहितीसुध्दा लावण्यात आली आहे. नागरिकांना विकास आराखड्याशी संबंधित माहिती, नकाशे तसेच आवश्यक बाबींबाबत कार्यालयीन वेळेत नगररचना विभागाचे रचना सहायक यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!