कुडाळ शहरातील रस्ते दुरुस्तीला वेग

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या पाठपुराव्याला यश
पावसाळ्यापूर्वी कुडाळ शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण तसेच गटार-नाल्यांच्या साफसफाईची कामे तातडीने हाती घेण्याच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या मागणीला अखेर यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या बैठकीत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरातील त्यांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच रस्त्यालगत असलेल्या गटार आणि नाल्यांची साफसफाई करून पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रही सादर केले होते.
नगराध्यक्षांच्या पाठपुराव्याची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध कामांना सुरुवात केली आहे. सध्या शहरातील प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजवण्याचे काम जोरात सुरू आहे. कुडाळ रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता, कुडाळ-मालवण मुख्य मार्ग, पोलीस ठाणे ते हॉटेल आरएसएनपर्यंतचा रस्ता तसेच कुडाळ-वेंगुर्ले मार्ग या प्रमुख रस्त्यांवर दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत.
या मार्गांवरून नागरिक, पर्यटक तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक होते. त्यामुळे नागरिकांकडून या कामांचे स्वागत करण्यात येत आहे.





