शिवापूर मध्ये मधमाशांच्या हल्ल्यात अकरा जण जखमी

माणगाव खोऱ्यातील शिवापूर वसोली सीमेवर धार्मिक कार्यक्रमासाठी लावलेल्या अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाशांनी हल्ला केल्यामुळे शिवापूर येथील सुमारे अकरा ग्रामस्थ जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेनंतर असलेल्या वाहनातून पळाल्यामुळे केवळ जीवितहानी टळली असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
शिवापूर येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अगरबत्ती लावल्यामुळे झालेल्या धुराच्या त्रासामुळे मधमाशांनी उपस्थित ग्रामस्थांवर अचानक हल्ला केला.यावेळी माजी सैनिक दिनकर पालकर यांनी गांभीर्य ओळखून सर्वांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी पत्रकार विजय पालकर,माजी सभापती मोहन सावंत यांनी लागलीच सर्वांना आपापल्या चारचाकी वाहनातून माणगाव च्या दिशेने घेऊन निघाले मात्र या घाईगडबडीत लहान मुलांसह अकरा जण जखमी झाले. त्या सर्वांना माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यातील शिवाजी नाना गुंजाळ,मधुकर कदम आणि अशोक गुंजाळ गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ जणांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.
या घटनेवेळी प्रसंगावधान राखून माजी सैनिक दिनकर पालकर,माजी सभापती मोहन सावंत आणि विजय पालकर यांनी जी मदत केली त्यामुळेच आमचे प्राण वाचले अशी प्रतिक्रिया जखमी रुग्णांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!