कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचा आज मुंबईत आक्रोश मोर्चा

अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश मंत्रालय हादरवेल ; विनायक राऊत यांचा इशारा

कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार दि. १५ मे ला मुंबईत भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना भवन येथे कोकणवासीयांशी संवाद साधताना ठाकरे शिवसेनेचे सचिव, शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला.
गिरगाव चौपाटी येथून सायंकाळी ४ वाजता सुरू होणारा हा मोर्चा मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’कडे धडकणार असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मोठ्या ताकदीने या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“शेतकरी वाचला तरच कोकण वाचेल,” या निर्धाराने हजारो शेतकरी, बागायतदार आणि कोकणवासी या लढ्यात सहभागी होणार असून सरकारने वेळेत दखल घेतली नाही, तर शेतकऱ्यांचा हा आक्रोश मंत्रालय हादरवेल, असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला.
आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई, हमीभाव तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

error: Content is protected !!