रासायनिक खताबरोबर शेतकऱ्यांना सेंद्रिय खत घेण्याची कणकवली खरेदी विक्री संघाची सक्ती!

शेतकऱ्यांमधून होतोय संताप व्यक्त

शेतकऱ्यांवर सक्ती करण्याचा खरेदी विक्री संघाला अधिकार आहे का?

येत्या काही दिवसांमध्ये मान्सून कोकणात दाखल होणार असताना शेतकरी शेतीच्या तयारी करता कामाला लागला आहे. त्यातच शेतीसाठी लागणारी खते शेतकऱ्याकडून पावसापूर्वीच नेऊन ठेवण्याची खबरदारी घेतली जात असताना मात्र कणकवली खरेदी विक्री संघामध्ये रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खत घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत आज एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सदरच्या शेतकऱ्याने तीन युरिया खताच्या पिशव्या खरेदी विक्री संघामध्ये मागणी केली. मात्र ही मागणी केल्यानंतर खरेदी विक्री संघाच्या खत व भाजीपाला बियाणे काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्यांने -तीन युरिया बॅग सोबत दोन सेंद्रिय खताच्या पिशव्या घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर सदर शेतकऱ्याने असा नियम आहे का? अशी विचारणा केली असता तुम्हाला हवे असेल तर घ्या. आम्हाला सूचना आहेत असे सांगत शेतकऱ्यांना सेंद्रिय खताची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान अशाप्रकारे शेतकऱ्यावर सक्ती करण्याचा खरेदी विक्री संघाला अधिकार आहे का? हा देखील एक मोठा प्रश्नच आहे. तरी देखील या प्रश्नी खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी काय भूमिका घेणार ? त्याकडे आता तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष राहिले लागून राहिले आहे. ज्या शेतकऱ्याला जे खत अपेक्षित असेल ते खत देणे हे खरेदी विक्री संघाचे काम आहे. शेतकऱ्याला आवश्यक असलेला पुरेसा खत साठा गोडाऊन मध्ये असताना देखील रासायनिक खतासोबत सेंद्रिय शेती खताची सक्ती खरेदी विक्री संघाने करण्यामागे नेमकी संघाची भूमिका काय? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!