गंगाराम सडवेलकर यांचं कार्य आदर्शवत : अतुल बंगे

पिंगुंळी केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम
दरवर्षी विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांच्यासाठी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम राबवुन जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी आदर्शवत असे काम करत आहेत. त्यामुळे पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघाला गंगाराम सडवेलकर यांच्या रुपाने आदर्श लोकप्रतिनिधी लाभला आहे, अशा शब्दात शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी श्री. पिंगुळकर यांचे कौतुक केले.
पिंगुंळी केंद्र शाळेत आज गंगाराम सडवेलकर मित्र मंडळ आयोजित शैक्षणिक कार्यक्रमात श्री बंगे बोलत होते. यावेळी श्री बंगे म्हणाले, श्री. सडवेलकर पंचायत समिती सदस्य झाल्यापासुन आज जिल्हा परिषद सदस्य होईपर्यंत अविरत स्वखर्चातुन कार्यक्रम घेऊन विद्यार्थी, शिक्षक आणि पालक त्याचबरोबर शाळा यांना प्रोत्साहन म्हणून कार्यक्रम घेऊन आज पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघाला एक आदर्श लोकप्रतिनिधी लाभला आहे, असे कौतुकही श्री बंगे यांनी केले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, आदर्श शाळा, आदर्श व्यवस्थापन समिती, उपक्रमशिल शिक्षक, विद्यार्थी विशेष पुरस्कार, आदर्श विद्यार्थी असे विविध पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी म्हणून सौ. सविता परब व श्री. संदेश किंजवडेकर या दोघांनाही बढती मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ गावडे, केंद्र मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, नेरुर गोवेरी मुख्याध्यापक श्रीम सुरेखा प्रभुखानोलकर, कुडाळ हायस्कूल सेवा निवृत्त शिक्षक व्ही के परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कदम, लक्ष्मण आगलावे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजा कविटकर यांनी केले. आभार लक्ष्मण गावडे यांनी मानले. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





