गडनदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी घेतला आढावा

कनकनगर बंधारा नदीपत्रातील गाळ पुढल्या वर्षी काढण्याची केली मागणी

केटी बंधाऱ्यांच्या प्लेट बाबत लघुपाटबंधारे विभागाला दिल्या सूचना

कणकवली शहरालगत असलेल्या गडनदीपात्रातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशन व शासनाच्या माध्यमातून सुरू असून, कणकवली शहराला या उपक्रमाचा फायदा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी मराठा मंडळ नजीकच्या नदीपात्रातील गाळ काढून झाल्यावर पुढल्या वर्षी कणकनगर बंधाऱ्याच्या भागातील देखील गाळ काढला जावा तसेच या बंधाऱ्याकरिता वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेट या जीर्ण झाल्या असल्याने नदीपात्रात साठवले जाणारे पाणी अनेकदा वाहून जात आहे. त्यामुळे या प्लेट देखील नव्याने बसविण्यात याव्यात. अशी मागणी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभाग व गाळ काढण्यासंदर्भात नाम फाउंडेशन यांच्याकडे केली.
कणकवली शहरालगत असणाऱ्या गडनदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी श्री नाईक यांनी केली व आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक संकेत नाईक नगरसेवक जयेश धुमाळे लघु पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अधिकारी विकास परब, नाम फाउंडेशन चे दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते. गड नदीपात्रात मराठा मंडळ नजीकच्या बंधाऱ्या जवळील देखील संपूर्णपणे गाळ उपसा करून तेथे नदीपात्र खोल करण्याची सूचना यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली. कनक नगर येथील बंधाऱ्याचे यावर्षी जरी काम प्रस्तावित करता आले नसले तरी पुढल्या वर्षी कणक नगर बंधारा पात्रातील गाळ काढला जाईल अशी ग्वाही लघु पाटबंधारे व नाम फाउंडेशनच्या वतीने यावेळी देण्यात आल्याचे श्री नाईक यांनी सांगितले. यामुळे कणकवली शहरातील नागरिकांना पाण्याची भेडसावणारी समस्या देखील काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असून पुढल्या वर्षी हे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना श्री नाईक यांनी दिल्या.

error: Content is protected !!