आचरा – तोंडवळी किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावली

३४२ पिल्लांची सुरक्षित समुद्रात मुक्तता; संवर्धन उपक्रमाला मोठे यश

दक्षिण कोकणातील आचरा, तोंडवळी व तळाशील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या संवर्धन उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी आचरा समुद्र किनाऱ्यावरून ९५ तर तोंडवळी–तळाशील किनाऱ्यावरून सुमारे २४७ अशा एकूण ३४२ नवजात कासव पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आले.
हा उपक्रम कांदळवन विभाग, दक्षिण कोकण तसेच वनपरिक्षेत्र मालवण (कांदळवन) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून स्थानिक कासव मित्रांच्या सहकार्याने अंडी संवर्धन, देखभाल व संरक्षणाचे काम करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. महादेव शिंगाडे व प्राजक्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पार पडले.
कासवांनी अंडी घातल्यानंतर साधारणतः ५० दिवसांनी पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. याच प्रक्रियेनंतर जन्मलेल्या पिल्लांना सुरक्षित वातावरणात वाढवून योग्य वेळी समुद्रात सोडण्यात आले.
यावेळी कासव मित्र सूर्यकांत कोचरेकर, गौरेश मालंडकर, ललित देऊलकर, दशरथ कोचरेकर, झकास खवणेकर, सर्वेश पेडणेकर, दीपेश मायबा तसेच आचरा येथील नितेश गितये उपस्थित होते. धर्मादाय आयुक्त ओरोस येथील संदीप कुंभार यांच्या हस्ते पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. तसेच सर्फमित्र स्वप्नील गोसावी, उद्योजक अजय कोयंडे, स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनीही या उपक्रमाला उपस्थित राहून कासव संवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन दिले.
वनविभाग मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम कासव संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरत असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक आदर्श उपक्रम म्हणून पाहिला जात आहे.
मंगळवारी सकाळी आचरा समुद्र किनारी ऑलिव्ह रीडले प्रजातीच्या कासवाच्या पिल्लांना स्थानिक कासव मित्रांनी समुद्रात सोडले

error: Content is protected !!