कणकवलीत तब्बल सहा ठिकाणी दुकाने फोडली

पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरांवर चोरट्यांचा धुमाकूळ
कणकवलीतील रहदारीच्या रस्त्यावरील चोरीने एकच खळबळ
कणकवली शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास तब्बल सहा दुकाने चोरट्याने फोडल्याची घटना घडली आहे. कणकवली आचरा रोडवर गजबजलेल्या रस्त्यावर सीसीटीव्ही या भागांमध्ये असून देखील झालेल्या दुकानातील चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर आता एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. कणकवली आचरा रोड हा नेहमीच गजबजलेल्या स्थितीत असतो. या मार्गापासून काही अंतरावरच कणकवली पोलीस स्टेशन आहे. असे असताना देखील चोरट्याने आचरा रोड येथील सना कॉम्प्लेक्स मधील तीन तर त्यापासून काही अंतरावर असणाऱ्या बेंगलोर अय्यंगार बेकरीच्या बाजूचे राज मेडिकल व अन्य तीन दुकानांची शटर उचकटून त्यामध्ये चोरी केल्याची घटना घडली. या चोऱ्यांमुळे एकच खळबळ उडाली असून अद्याप चोरीला गेलेला मुद्देमाल जरी स्पष्ट झाला नसला तरी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर झालेल्या चोऱ्यांमुळे आता पोलिसांसमोर एक मोठे तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. याबाबत पोलिसांत अद्याप तक्रार दाखल नसली तरी या चोऱ्यांचा तपास तात्काळ करण्याची मागणी केली जात आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





