लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयिताला जामीन

ऍड. संजीवकुमार प्रभु यांचा युक्तिवाद
लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी संशयित श्रीधर उर्फ अक्षय धोंडी नाईक रा. चेंदवण याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी १५ हजार रुपयांचा जामीन अटी व शर्थीसह मंजूर केला. संशयिताच्या वतीने वकील संजीवकुमार प्रभू यांनी युक्तिवाद केला.
याबाबत ऍड. संजीवकुमार प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2025 ते दिनांक 4 मार्च 2026 पर्यंत श्रीधर उर्फ अक्षय धोंडी नाईक रा. चेंदवण याने फिर्यादी हिचेशी लग्न करतो असे सांगून वारंवार शारीरिक संबंध ठेवून त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर फिर्यादी हिने त्याला लग्न कधी करणार असे विचारले असता त्याने लग्नासाठी नकार देऊन फिर्यादी व तिचे आईस मारून टाकीन अशी धमकी दिली.त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेऊन तिची फसवणूक केली म्हणून आरोपी विरुद्ध कुडाळ पोलीस स्टेशनला दिनांक 4 मार्च 2026 ला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी याला दिनांक 9 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आलेली होती. त्याला 13 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
आरोपीतर्फे जामीनासाठी सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. आरोपीतर्फे ऍड. एस. सी. प्रभु यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी रक्कम रु.15000/- चा जामीन अटी व शर्थीसह मंजूर केला. संशयित आरोपीतर्फे ऍड. संजीवकुमार प्रभु तसेच ऍड. लक्ष्मण मार्गी आणि ऍड अश्विनी बोभाटे यांनी काम पाहिले. अशी माहिती वकील संजीवकुमार प्रभू यांनी दिली.





