आचरा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात

गुरुकुल सहकारी संस्थेची जमिन,वायंगणी गाव ई पीक,तलाठी कार्यालय स्थलांतर आदीबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रश्न
उपजिल्हाधिकारी नितीन राऊत,मालवण तहसिलदार गणेश लव्हे यांची प्रमुख उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत गुरुकुल गृहतारण संस्था आचरे शासन दरबारी रजिस्टर होऊन याबाबत रितसर अर्ज करुनही गेली एकदोन वर्षे भूखंड संस्थेच्या नावावर होण्यासाठी झालेला विलंब, वायंगणी ईपीक पाणी वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांचे भात खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, वायंगणी ग्रामपंचायत येथे तलाठी कार्यालयास जागा दिली जात असतानाही पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेले कार्यालय, आदींबाबत ग्रामस्थांनी समाधान योजनेत प्रश्न उपस्थित करत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.याबाबत योग्य ती माहिती घेउन कार्यवाही करण्याची ग्वाहीमालवण तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत आचरा मंडळ स्तरावर आचरा हायस्कूल सभागृह येथे आयोजित समाधान शिबिराचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांच्या सोबत आचरा सरपंच जेरोम फर्नांडिस, देवस्थान समिती अध्यक्ष प्रदीप गोपाळराव प्रभूमिराशी, मालवण पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर,दिपक सुर्वे,वायंगणी सरपंच रुपेश पाटकर,तोंडवळी सरपंच श्रीमती तोंडवळकर,आचरा उपसरपंच संतोष मिराशी,माजी. सभापती श्रीमती हिमाली अमरे,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,संजय मिराशी, रघुनाथ पाटील, मंगेश टेमकर,नायब तहसिलदार विनायक जांभेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फर्नांडिस,आचरा मंडल अधिकारी उमेश सिंघनाथ, निलेश सरजोशी, अनिल करंजे,अजय परब, तलाठी श्रीमती शिरसाठ,गणगे,पोलीस पाटील सुनील खरात, जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी, अमोल पेडणेकर यांसह महसूल विभागातील अन्य अधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यावेळी शासनाच्या विविध खात्यांमधील योजनांची माहिती खातेप्रमुखांनी ग्रामस्थांना दिली.
उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, तसेच मालवण तहसीलदार गणेश लव्हे त्यांच्या हस्ते जातीचे, वय अधिवास, श्रावण बाळ, शिधा पत्रिका, उत्पन्न दाखला, प्रधान मंत्री घरकुल योजना, आयुष्यमान, आरोग्य पत्रिका, अद्ययावत सातबारा तसेच विविध लाभार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
शिबिरामध्ये अकृषक परवानगी व अकृषिक तरतुदी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. ७/१२ दुरुस्तीसाठी.-८ अर्ज स्वीकारण्यात आले. डिजिटल ७/१२ चे १२२ उतारे व ८ अ चे ५२ उतारे उपलब्ध करून देण्यात आले. फेरफारची २२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. विविध प्रकारची ६२२ प्रकरणे वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी बांवकर यांनी केले.तर आभार जिल्हा पोलिस पाटील संघटना अध्यक्ष सुनिल खरात यांनी केले.





