कणकवली येथे शास्त्रीय संगीत धृपद–धमार गायन कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

आदर्श संगीत विद्यालय कणकवली यांच्यावतीने नुकतीच शास्त्रीय संगीत धृपद–धमार गायनाची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
पुणे येथील संगीत अलंकार सौ.तनुजा पांडे यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. त्या गेल्या पंधरा वर्षांपासून पंडित उदय भवाळकर यांच्याकडे प्राचीन अशा धृपद गायनाचे शिक्षण घेत आहेत.
कणकवली येथील ज्येष्ठ संगीत तज्ञ श्री. बाळ नाडकर्णी सर, उद्योजक श्री. गजेंद्र कृपाळ, मार्गदर्शक सौ. तनुजा पांडे, आदर्श संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ. तेजस्विता पेंडूरकर, संचालक संदीप पेंडूरकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून व गुरुवर्य कै. वामनराव काराणे सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
भारतीय शास्त्रीय संगीतातील प्राचीन आणि गंभीर मानली जाणारी धृपद–धमार गायन शैली याविषयीच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना धृपद आणि धमार या शैलींची सखोल माहिती देण्यात आली. धृपद ही भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात जुनी गायनपद्धती असून तिची परंपरा स्वामी हरिदास आणि तानसेन यांच्या काळापासून सुरू झाली. रागाची शुद्ध मांडणी, गंभीर आलाप आणि पखवाजाची साथ हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे.
धमार ही धृपदाशी निगडित शैली असून ती प्रामुख्याने १४ मात्रांच्या धमार तालात गायली जाते. विशेषतः होळीच्या प्रसंगाशी संबंधित रचना या शैलीत आढळतात.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह नोम तोम आलाप, रागमांडणी, तालरचना, लयकारी यांचे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. शास्त्रीय संगीत गायनचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यशाळा यशस्वी केली.
आदर्श संगीत विद्यालय कणकवलीच्या वतीने शास्त्रीय संगीताची परंपरा जतन व संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते.

बालकलाकार ओवी पांडे हिचे विशेष सादरीकरण

कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी झालेल्या विशेष संगीत मैफिलीमध्ये भारत सरकारची 2025 सालची मानाची CCRT शिष्यवृत्ती आणि ITC SRA कलकत्ता या संस्थेची शास्त्रीय संगीत शिष्यवृत्ती प्राप्त बालकलाकार ओवी पांडे हिने ध्रुपद धमार गायन सादर केले. यात सुरुवातीस मुलतानी रागातील नोम तोम आलापी करून बंदिश सादर केली. यानंतर देस या रागातील धृपद आणि पंडित उदय भवाळकर यांनी स्वरबद्ध केलेली एक रचना सादर केली.संपूर्ण गायनामध्ये स्वर व ताल यांच्यावरील तिची हुकूमत, स्वरलगाव, विविध प्रकारची लयकारी ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले.
पं. श्री.उदय भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्रुपद शिकत आहे. ती गुरू-शिष्य परंपरेत शिकत आहे.

ओवी हिच्या गायनानंतर तनुजा पांडे यांचे गायन झाले. त्यांनी दादरा, हवेली संगीत, रवींद्र संगीत,चैती,गौरी या अनवट गीतप्रकारांचे सादरीकरण केले. शेवटी भैरवी रागातील भजन गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण कार्यशाळा व कुमारी ओवी पांडे व तनुजा पांडे यांच्या सादरीकरणासाठी पुणे येथील मृदुंगमहर्षी पं. माणिक मुंडे व तालमणी श्री. सुखद मुंडे यांचे शिष्य श्री. प्रणय सकपाळ यांची पखवाज साथ लाभली. तसेच, संगीत मैफिलीला तबला साथ पुणे येथील स्वप्नील पवार व संवादिनी साथ संदिप पेंडुरकर यांची लाभली.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा छोटे रोप व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मीनल केळुस्कर व मृणाल गावकर यांनी केले.संचालिका सौ. तेजस्विता संदिप पेंडुरकर यांनी आभार मानले. या संगीत मैफिलीला कणकवलीतील बहुसंख्य संगीत रसिक उपस्थित होते.

error: Content is protected !!