प्रधानमंत्री पोषण योजना अंतर्गत फायबर किचन शेड च्या निकृष्ट कामांमुळे योजनेला हरताळ

कणकवली तालुक्यात ठेकेदाराकडून बोगस कामे केल्याचा प्रकार उघड

सुट्टीच्या दिवशीचा फायदा घेत बेकायदेशीरपणे शाळेच्या आवारात केली जात आहेत कामे

संबंधित ठेकेदारावर कारवाई कोण करणार? उपस्थित होतोय सवाल

प्रधानमंत्री पोषण योजना स्वयंपाक घर बांधकामा संदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये फायबर किचन शेड ची कामे केली जात असताना या करता नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे समोर आले आहे. या ठेकेदाराकडून सुट्टीच्या दिवशी शिक्षक शाळेत नसल्याचा फायदा घेत निकृष्ट कामे रात्रीच्या वेळी करून पळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच याकरिता संबंधित ठेकेदाराकडे कामाचे आवश्यक कागदपत्र किंवा अन्य परवानगीच्या बाबी नसल्याने हा सावळा गोंधळ सध्या सुरू आहे. त्यातच किचन शेड करिता बांधण्यात येणाऱ्या चौथर्‍याच्या कामाकरिता देखील कोणतेही बांधकामाचे नियम व निकष न पाळता ही बांधकामे केली जात असल्याने काही ठिकाणी केलेली बांधकामे दोन ते तीन दिवसातच आतील खडी ग्रेट बाहेर आल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग व तालुका शिक्षण विभाग हे या साऱ्या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत. या निकृष्ट कामांमुळे जर या ठिकाणी भविष्यात दुर्घटना घडली किंवा या कामांची दुरुस्ती करायची वेळ आली तर त्याची जबाबदारी कोणाकडे असणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या निकृष्ट कामे करून पळ काढणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी कडे लक्ष कोण देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कणकवली तालुक्यामध्ये काही ठिकाणी पोषण आहारासाठीच्या फायबर किचन शेड ची उभारणी करण्यासाठी ठेकेदाराकडून काँक्रीट चा बांधलेला चौथरा हा बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनीच्या वरच काँक्रीट ओतून कोणताही बेस न करता अधांतरी ही कामे करण्यात आली आहेत. त्यातच चौथऱ्याचे काम केल्यापासून त्याच्यावर पाणी न मारल्यामुळे अनेक ठिकाणी या कामातील निकृष्ट पणा समोर आला आहे. दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले आहे. परंतु शाळेसारख्या महत्त्वाच्या मुलांच्या हिताच्या दृष्टीने बांधल्या जाणाऱ्या या फायबर शेड च्या निकृष्ट कामाबाबत ठेकेदारांवर काय कारवाई होणार असा सवाल आता पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मधून उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!