देवगड नगरपंचायत चे नगरसेवक रोहन खेडेकर अपात्र

अनधिकृत बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

देवगड नगरपंचायत मध्ये भाजपा सत्ता स्थापन करणार?

देवगड नगरपंचायतच्या राजकीय घडामोडींना जोरदार वेग

सिंधुदुर्ग : देवगड जामसंडे नगरपंचायतच्या नगरसेवक पदाचा गैरवापर करत अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी देवगड नगरपंचायत चे प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक रोहन खेडेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे देवगड नगरपंचायत मध्ये सत्ताधारी असलेल्या ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी हे आदेश दिले आहेत. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर केलेल्या स्थळ पाहणीनुसार सदर गट नंबर मध्ये नगरसेवक रोहन खेडेकर व त्यांचे भाऊ उमेश खेडेकर यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. सदर बांधकाम हे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या नगरसेवक पदाच्या कालावधीतले असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होत त्यानुसार आवश्यकतेनुसार घेतलेले अहवाल हे होकारार्थी आल्यानंतर अर्जदार योगेश चांदोस्कर यांचा अर्ज मंजूर करून श्री. खेडेकर यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये ठाकरे गटाला धक्का बसला असून, यामुळे देवगड जामसांडे नगरपंचायत मध्ये आठ – आठ असे समसमान बलाबल झाले आहे. त्यामुळे आता देवगड जामसंडे नगरपंचायत च्या सत्तेची सूत्रे कोणाकडे राहणार? ठाकरे गट सत्तेतून पायउतार होणार का? भाजपा सत्ताधारी ठरणार का? यासह असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे देवगड जामसांडे नगरपंचायत च्या राजकीय वातावरणात आता मोठे फेरबदल होणार असून या अनुषंगाने राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत.

दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग

error: Content is protected !!