महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी

डॉ. शमिता बिरमोळे यांचे आवाहन
कणकवलीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
स्त्रीचे आरोग्य सदृढ असेल तर कुटुंब आणि समाजाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे स्त्रियांनी आपले आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यासाठी समतोल व सकस आहार घेतला पाहिजे. धकधकीच्या जीवनात स्त्रियांचे आरोग्यकडे दुर्लक्ष होत असल्याने स्त्रिया रोग व आजारांना बळी पडत आहेत. रोग व आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्त्रियांनी नियमित आरोग्य तपासणी करावी, असा सल्ला स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शमिता बिरमोळे यांनी दिला.
स्त्री मुक्ती दिन व मनस्मृती दहन दिनानिमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी व भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेतर्फे सोनगेवाडी येथील शाखेच्या कार्यालयात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी डॉ. बिरमोळे बोलत होत्या. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष प्रा. सुषमा हरकुळकर, राष्टÑीय सचिव प्रभाकर जाधव, संजय पेंडुरकर, दीपाली चांदोसकर, चंद्रकांत म्हापणकर, रविकांत डांगमोडे, स्नेहा पेंडुरकर, रविना कांबळे, ममता जाधव, सुप्रिया तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बिरमोळे यांनी महिलांना आपल्या आरोग्याची कशाप्रकारे काळजी घ्यावी यावर सविस्तर मार्गदर्शन करताना महिन्यातून किमान एकदा तरी महिलांनी आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने डॉ. शमिता बिरमोळे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अपूर्वा पवार यांनी केले. शिबिराच्या उद्घाटनंतर वैद्यकीय टीमने महिलांची आरोग्य तपासणी केली.





