चिंदर येथील भगवती माऊली देवीच्या जत्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सवास गुरुवार सकाळ पासूनच उत्साहात सुरूवात झाली. दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी गर्दी उसळली होती.
सकाळी बारा पाच मानकरी जमल्या नंतर देवीला गा-हाणे घालून साडी चोळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आली.त्यानंतर बारा पाच मानक-यांचे नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आले. यानंतर भाविकांचे नवस फेडणे ओटी भरणेला सुरुवात करण्यात आली होती. सकाळ पासूनच दर्शनाला मंदिरा बाहेर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देवीचे दर्शन सुलभ होण्यासाठी देवस्थान मानकरी, श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परीश्रम घेत होते. श्री सिद्धेश्वर भजन मंडळ चिंदर सडेवाडी यांच्या कडून भाविकांसाठी मोफत शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
रात्रौ उशिरा ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवतांचे तरंगांचे भगवती मंदिराकडे आगमन होणार आहे.
पहाटे तीन वाजता पुराण गोंधळ व दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या दिवट्यांचे नृत्य होणार आहे. मंदिर परीसर खाद्य पदार्थासह विविध वस्तूंच्या दुकानानी सजला आहे. या जत्रोत्सवात ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात कनगी विक्री साठी येत असल्याने भगवती माऊलीच्या जत्रोत्सवाचे ते एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या जत्रोत्सवाला कनग्याची यात्रा म्हणूनही ओळखली जाते. या जत्रोत्सवाच्या व्यवस्थेसाठी चिंदर ग्रामपंचायत कडूनही विक्रेत्यांना सहकार्य केले गेले होते. पाच दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवाला पहिल्या दिवसापासूनच उत्साहात सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ देऊळवाडी, ६.३० वा. श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ साटमवाडी, रात्री ७.३० वा. गावडे पुरुष प्रासादिक भजन मंडळ गावडेवाडी यांचे भजन होणार आहे. रात्रौ ९ वाजल्यानंतर पुराण, किर्तन श्रींची आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.
शनिवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी स्थानिक भजने यात ४ वा. श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ सडेवाडी, ५.३० वा. श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकर वाडी, ६. ३० वा. श्री देव वाडत्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ कोंड अपराजवाडी यांचे भजन, ७. ३० वा. श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी यांचे भजन होणार आहे.
रविवार ७ डिसेंबर रोजी ५.३० वा श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ लब्दे वाडी, ६.३० वा श्रीदेव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तेरई वाडी, ७.३० वा. श्री देव आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ गावठण वाडी यांचे भजन होणार आहे. रात्रौ ९ वाजता पुराण गोंधळ किर्तन, आरती आदी कार्यक्रम.
रात्रौ. १०.३० वा. श्री भवानी रामेश्वर डंपर सर्विस मनोज हडकर पुरस्कृत, श्री दत्त माऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यांचा महान दशावतार नाट्य प्रयोग “वेसरोत्पत्ती” सादर होणार आहे.
सोमवार ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ६ वा. चालू वहिवाट दार घाडी कुटुंबिय, सर्व महिला यांच्या मार्फत हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ६ वा. श्री देव पिसाळी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ तेरई, ७ वा. श्री देव भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी यांची भजने होणार आहेत. रात्रौ ९ वा. पुराण, रात्रौ १० वा. भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी आयोजित कौटुंबिक, सामाजिक, हृदयस्पर्शी तीन अंकी नाटक “सासुरवास” सादर होणार आहे. यानंतर रात्रौ २.३० नंतर गोंधळ किर्तन, लळित समाप्ती व दिवट्या नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर, ग्रामस्थ याच्यावतीने करण्यात आले आहे.





