संकल्प प्रतिष्ठान व्दारा कणकवली येथे करवंटी हस्तकला प्रशिक्षण उत्साहात

तामीळनाडू येथील या व्यवसायातील तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकाची करण्यात आली होती निवड
नुकताच कणकवली येथे संकल्प प्रतिष्ठान आयोजित ३ दिवसीय करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी श्रीम. शुभांगी साठे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी श्री. राजेश कांदळगांवकर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरादअली शेख, समन्वयक अमोल परब व प्रशिक्षक श्री. आनंद आदी मान्यवर उपस्थित होते. मानवरांच्या शुभहस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
संकल्प प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा नारळाच्या करवंटी पासून उपयुक्त/आकर्षक वस्तू प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संकल्प प्रतिष्ठान ही संस्था राज्यस्तरिय नोंदणीकृत असून गेली १४ वर्षे या संस्थेद्वारा उद्योग, व्यवसाय व कृषी विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे. याचा अनेकांनी लाभ घेऊन आपले उद्योग/व्यवसाय सुरू केले आहेत व इतरांना ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीलगत मोठ्या प्रमाणावर नारळाची लागवड झालेली आहे. त्यामुळे नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करंवट्या ही उपलब्ध होतात. त्या विशेषकरून जाळण्यासाठी वापरल्या जातात. त्याऐवजी त्यापासून उपयुक्त/आकर्षक वस्तू निर्माण करणे शक्य आहे. या वस्तूंना मोठी मागणीही आहे. त्यामुळे अर्थार्जन होईल व करवंटी ज्वलनाने होणारे प्रदुषणही टळेल.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार, महिला, शेतकरी इत्यादींना एक स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या नाविण्यपूर्ण व प्रात्यक्षिकवर आधारित प्रशिक्षणाचा सिंधुदुर्ग सोबत रत्नागिरी, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, धुळे इत्यादी जिल्हातील प्रशिक्षणार्थीनी लाभ घेतला. प्रशिक्षक म्हणून तामीळनाडू येथील या व्यवसायातील तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकाची निवड करण्यात आली होती.
सर्व प्रशिक्षणार्थीनी या नाविण्यपूर्ण प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करून संकल्प प्रतिष्ठानने ही संधी उपलब्ध करून दिल्याबाबत आभार मानले.





