सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिक्षा व दंड अपिलात रद्द

ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील तत्कालीन उपसरपंच सुशिल अर्जुन चमणकर यांना वेंगुर्ले न्यायालयाने केलेली शिक्षा व दंड फौजदारी अपिलात जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केली आहे. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
उभादांडा ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तुषार काशिनाथ हळदणकर हे २९ मार्च २०१४ रोजी सायंकाळी काम करत होते. यावेळी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी जॉकी डिसोजा यांचा प्रस्ताव तयार का केला नाही, असा सवाल करत उपसरपंच सुशिल चमणकर यांनी हळदणकर यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच प्रस्ताव केला नाही तर २०० लोकांचा मोर्चा घेऊन येईल, तुझी बदली करेन, अशी धमकी दिली. तसेच हळदणकर लिहीत असलेले त्या प्रस्तावाचे कागदपत्र काढून घेऊन अन्य कर्मचाऱ्यांसमोर फाडून टाकले व शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत हळदणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध भादवि ३५३, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी वेंगुर्ले न्यायालयाने ४ ऑगस्ट २०१६ रोजी आरोपीला दोषी ठरवत एक महिन्याचा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास दहा दिवस कारावासाची शिक्षा सुनावली होती.
याविरूद्ध आरोपीच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. सुनावणीमध्ये संशयास्पद पंचनामा, तपासातील श्रृटी यामुळे प्रमुख जिल्हा न्यायाधिश सुधीर देशपांडे यांनी अपिल मान्य करत शिक्षा व दंड रद्द करत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.





