‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने गौरविलेल्या सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे प्रशालेचा अभिमान!

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचा संगम जिथे घडतो, त्या शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक हे खरे समाजशिल्पकार असतात. अशाच एका समाजशिल्पकाराने आपल्या अथक परिश्रमांद्वारे, शैक्षणिक दृष्टीने नाविन्यपूर्ण कल्पना साकारत आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात उजेड पसरवत उल्लेखनीय कार्य घडवून आणले आहे. त्या म्हणजे ज्ञानदा शिक्षण संचालित आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडे च्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम, ज्यांना नुकताच ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन, बारामती तर्फे दिला जाणारा ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. कणकवली नगर वाचनालय सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.या सोहळ्यासाठी श्री वामन तर्फे( सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ अध्यक्ष) तसेच मुख्याध्यापक संघ कार्यवाह रामचंद्र घावरे सर, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे सर पर्यवेक्षक अच्युतराव वणवे सर, कणकवली केंद्रप्रमुख अनंत राणे सर, कासार्डे केंद्रप्रमुख श्री. संजय पवार,वागदे केंद्रप्रमुख श्री. सूर्यकांत चव्हाण सर, सेवानिवृत्त अधिकारी शिक्षण विभाग कोल्हापूर श्री.मोहन सावंत सर आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, शैक्षणिक नेतृत्वगुण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि शिक्षक-पालक-विद्यार्थी या त्रिसूत्रीला एकत्र आणणारे त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
सौ.अर्चना देसाई मॅडम यांनी गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात अत्यंत समर्पणाने कार्य करत, संस्थेला नव्या उंचीवर नेले आहे. “शाळा ही फक्त शिक्षण देणारी संस्था नसून, ती जीवन घडविण्याची प्रयोगशाळा आहे,” हा त्यांचा ठाम विश्वास. त्यांच्या नेतृत्वाखाली आयडियल इंग्लिश स्कूलने शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.
देवदुर्लभ सहनशीलता, विद्यार्थ्यांप्रती मातृत्वभाव, शिक्षकांप्रती सहकार्यशील दृष्टिकोन आणि संस्थेबद्दल निष्ठा या चार गुणांच्या आधारे त्यांनी शिक्षणविश्वात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यकाळात शाळेच्या निकालात सातत्याने प्रगती होत गेली, विद्यार्थ्यांनी विज्ञान, कला,क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले.
या सन्मानासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विध्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे,सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत, सल्लागार श्री. डी.पी. तानावडे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.





