कुडाळ न. प. च्या कचरा प्रकल्पाविरुद्धपात संघर्ष समितीचे लाक्षणिक उपोषण

प्रकल्प रद्द न झाल्यास एमआयडीसी कार्यालयात आत्मदहन करणार
‘वरती कळवितो’… एमआयडीसी प्रशासनाचे चाकोरीबद्ध उत्तर
कुडाळ एमआयडीसीमध्ये भूखंड क्रमांक जी-०२/०२ येथे नगर पंचायत मार्फत उभारण्यात येणाऱ्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आजूबाजूच्या भूखंडधारक उद्योजक, रहिवासी, प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाविरोधात कुडाळ एमआयडीसी घनकचरा प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने गवळदेव येथील एमआयडीसी कार्यलयासमोर आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जर एमआयडीसीने तो प्रकल्प तिथून हटविला नाही तर एमआयडीसी कार्यलयात येऊन आत्मदहन करू असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.
एमआयडीसी येथील जी-०२/०२ या भूखंडवर कुडाळ नगर पंचायतीचा घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याचे भूमिपूजन अलीकडेच आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी सुद्धा तेथील रहिवाश्यांनी आणि उद्योजकांनी याला विरोध केला होता. कुडाळ दौऱ्यावर आलेल्या उद्योग मंत्र्यांची भेट देखील या संघर्ष समितीने घेतली होती. पण हा प्रकल्प बंद होण्याबाबत कोणतीच ठोस भूमिका शासनाकडून घेण्यात आली नसल्याने संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी सकाळपासून एमआयडीसी कार्यलयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात स्थानिक, भू प्रकल्पग्रस्त, निवासी भूखंड धारक, न्याहारी व्यवसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या संघर्ष समितीचे म्हणणे आहे कि, कुडाळ एमआयडीसी येथील भूखंड क्रमांक G/०२/०२ हा एमआयडीसीच्या रत्नागिरी येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयातून नगरपंचायत कुडाळ यांना कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी वितरित करण्यात आला आहे. या भूखंडाच्या भोवताली भू प्रकल्प बांधवांची फार मोठी वस्ती आहे. तसेच चार इस्पितळे आहेत, चार अन्नप्रक्रिया उद्योग आहेत, औद्योगिक व व्यापारी आस्थापने आहेत तसेच अनेक निवासी भूखंड आहेत. त्यामुळे या कचरा प्रकल्प उद्योगामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्याची कोणतीच योजना आखलेली दिसत नाही. एमआयडीसी परिसरात भूखंड वाटपाच्या नियमानुसार अशा प्रकारच्या उद्योगांना परवानगी दिल्या जात नाही. त्यामुळे जी-०२/०२ या भूखंडावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करावा अशी आमची संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उदघाटनावेळी आमदादर निलेश राणे यांनी वेंगुर्ले येथील कचरा प्रकल्पाचे उदाहरण दिले होते. तिथे कोणतंही दुर्गंधी येईल नाही हेही पटवून दिले होते. याबाबत उपोषणकर्ते राजू परब याना विचारले असता ते म्हणाले, वेंगुर्ले येथे त्या प्रकल्पामुळे मच्छर वाढले आहेत, विहिरींचे पाणी खराब होऊन पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्या प्रकारचे तेथील नागरिकांचे बाईट आमच्याकडे आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आम्हाला येथे नको. प्रकल्पाला आमचा विरोध नाही पण नंबर पंचायतीने हा प्रकल्प एमआयडीसी मध्ये उभारू नये असे श्री. परब यांनी सांगितले. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथे भेट घेतली. पण त्यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवुया असे म्हटल्याचे श्री. परब म्हणाले.
दरम्यान एमआयडीसीचे एरिया मॅनेजर श्री. कसबे आणि उपअभियंता अविनाश रेवणकर यांनी उपोषणस्थळी जात उपोषण कर्त्यांची भेट घेतली. आपल्या भावना वरिष्ठाना कवळितो असे त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितल्यावर उपोषणकरते आक्रमक झाले ? अजून किती वेळा तुम्ही आमच्या भावना वरिष्ठांना कालविणार आहात ? यापूर्वी आम्ही पत्र दिली त्या पत्रांना तुम्ही का उत्तरे दिली नाहीत ? अशा प्रश्नांची सरबत्तीच अधिकाऱ्यांवर करण्यात आल्यावर अधिकारी निरुत्तर झाले. आणि निघून गेले. ठोस भूमिका न घेणाऱ्या या अधिकाऱ्यांचा उपोषण कर्त्यांनी निषेध केला.
सत्तेत असूनही उपनगराध्यक्ष उपोषणात सहभागी
दरम्यान कुडाळ नगरपंचायतचे भाजपचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी या उपोषणाला पाठिंबा देत ते उपोषणाला बसले होते. त्याबद्दल त्यांना विचारले असता, ते म्हणाले कि मी या ठरवला विरोध केला होता. आणि हा माझ्या वॉर्डातील विषय आहे, त्यामुळे मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या सोबत राहणार असे स्पष्ट केले.
या उपोषणात कुडाळ एमआयडीसी घनकचरा प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने सुधाकर गाळवणकर, उमेश गाळवणकर, राजू परब, प्रसाद धोंड, अरुण बागवे, राजाराम गवस, नरसेवक मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, तुळशीदास पिंगुळकर, प्रशांत राणे, प्रफुल सामंत आदी सुमारे शंभरहून अधीक उद्योजक, रहिवासी, प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.





