उद्धव ठाकरे यांचा निरोप, कणकवली साठी ठाकरे सेनेचे नेते मुंबईत!

शिंदे व ठाकरे शिवसेना कणकवलीत शहर विकास आघाडी एकत्र होण्याच्या मुद्द्यावर चर्चा

नारायण राणेंच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय घडामोडींना वेग

माजी आमदार वैभव नाईक यांच्या भूमिकेकडे लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीची हवा आता राज्याच्या राजकारणात चर्चिली जाऊ लागली असून, राज्याच्या राजकारणात देखील या निवडणुकीने एक वेगळा ट्विस्ट आणला आहे. कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये शिंदे व ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याची संकेत दिले गेले असतानाच, या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे कणकवलीतील प्रमुख पदाधिकारी तडका फडकी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काल एका मुलाखती दरम्यान विचारलेल्या प्रश्नात त्यांनी या संदर्भात तेथील स्थानिक नेत्यांशी मी चर्चा करतो असे उत्तर पत्रकारांना दिले. व त्याच पार्श्वभूमीवर आज रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर सुशांत नाईक यांच्यासहित ठाकरे शिवसेनेचे कणकवलीतील प्रमुख नेते हे तडकाफडकी मुंबई मध्ये दाखल झाले असून त्यांची आज उद्धव ठाकरेंनी बरोबर कणकवलीतील निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे कणकवलीत होऊ घातलेल्या या राज्यातील बहुदा होणाऱ्या पहिल्या अप्रत्यक्ष युतीला संमती देणार का? उद्धव ठाकरेंचा या युतीबाबत काय निर्णय असणार? व संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे “ताकद” पुरवणार का? ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. एकीकडे भाजपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले. पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीच्या मेळाव्यात तसे स्पष्टपणे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आदेश देत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जर भाजपा स्वबळावर लढत असेल तर आमची देखील स्वबळावर लढण्याची तयारी असेल असे सूतोवाच राज्याचे उद्योग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी जाहीर केले. दरम्यान काल माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री नितेश राणे रवींद्र चव्हाण यांना स्वबळाच्या भूमिकेबाबत सल्ला दिलेला असतानाच कणकवली जर ठाकरे व शिंदे शिवसेनेची युती झाली तर दोन्ही जिल्ह्यात शिंदे शिवसेनेशी संबंध तोडू असा निर्वाणीचा इशारा दिला. व त्यानंतर अवघ्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वीच ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा भागातील दौऱ्या दरम्यान शिंदे शिवसेनेशी युती करू नका असे स्पष्ट आदेश दिले होते. असे आदेश दिल्यानंतर काही तास उलटतात तोच कणकवलीत शिंदे व ठाकरे सेनेचे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याची समीकरणे चर्चेत येऊ लागली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना काल एका मुलाखती दरम्यान पत्रकारांनी हा प्रश्न विचारला व अशी युती केली जाणार का? किंवा या युतीला तुमची संमती आहे का? असा प्रश्न उपस्थित करताच उद्धव ठाकरे यांनी मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो मग त्यानंतरच या विषयावर बोलतो असे स्पष्ट केले. व त्यानंतर लागलीच ठाकरे शिवसेनेच्या कणकवली नगरपंचायत शी संबंधित असणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी मुंबईला बोलावून घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर आज या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत कणकवलीतील या शिवसेनेच्या संभाव्य युतीबाबत बैठक होत त्यामध्ये चर्चा केली जाणार आहे व त्यानंतर याबाबत काय निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत माजी आमदार वैभव नाईक यांची भूमिका महत्वाची असणार आहे. वैभव नाईक हे शिंदे शिवसेनेशी किंवा सत्ताधारी पक्षाशी युती करणार नाही असे सांगत असले तरी नुकत्याच झालेल्या बैठकीवेळी वैभव नाईक यांच्या सोबत शिंदे शिवसेनेचे नेते माजी आमदार राजन तेली देखील उपस्थित होते. त्यामुळे याबाबत वैभव नाईक हे कणकवलीतील या संभाव्य युतीबाबत काय भूमिका घेणार ते देखील महत्त्वाचे असणार आहे. तसेच आजच्या मुंबई उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या बैठकीला वैभव नाईक उपस्थित राहणार का? ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. कारण अशा प्रकारे जर युती झाली शहर विकास आघाडीबरोबर शिंदे व ठाकरे शिवसेना एकत्र आली तर कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक यांची काय भूमिका असणार? ठाकरे व शिंदे शिवसेना कुडाळ मध्ये एकत्र येण्याची शक्यता फार कमी असताना माजी आमदार वैभव नाईक यांनी या साऱ्या घडामोडींमध्ये सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. माजी खासदार विनायक राऊत हे आज उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी माजी आमदार वैभव नाईक हे देखील उपस्थित राहिले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे सेनेतील अनेक गोष्टी चर्चेत येऊ शकतील. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत कणकवलीत होऊ घातलेली नवीन समीकरणे आज उद्धव ठाकरे मोडीत काढणार? की राणेंना कणकवलीत हरवण्यासाठी शहर विकास आघाडीतून होऊ घातलेल्या नवीन समीकरणांना “बळ” देत राणे विरोधाचा “संदेश” देणार ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!