व्हिजन ठेवून काम करा – हणमंतराव गायकवाड

हणमंतराव गायकवाड यांचा उद्योजकांना कानमंत्र

गायकवाड यांनी उलगडला बीव्हीजीचा प्रवास

कुडाळ : तुम्ही जे काम करताय ते सर्वोत्तम कसे होईल त्याकडे लक्ष द्या. तुमची टीम चांगली असली पाहिजे. जगात संधी खूप आहेत. व्हिजन ठेऊन काम करा. एकत्र येऊन काम करा असा संदेश प्रख्यात उद्योजक बीव्हीजी कंपनीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी दिला. कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात श्री. गायकवाड बोलत होते.
कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेत प्रख्यात उद्योजक आणि भारत विकास ग्रुप अर्थात बीव्हीजी कंपनीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या मुलांनी गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर हणमंतराव गायकवाड, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव ऍड. नकुल पार्सेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हणमंतराव गायकवाड यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला जल अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
हणमंतराव गायकवाड यांनी आपला जीवन प्रवास उलगडून दाखवला. अत्यंत गरिबीतून त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली. हणमंतराव गायकवाड यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला. सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूरच्या न्यायालयात त्यांचे वडील कारकून होते तर आई घरगृहिणी होती. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण रहिमतपूरलाच झाले. चौथीत असतानाच त्यांना राज्यसरकारची शिष्यवृत्ती मिळाली. पाचवीसाठी हणमंतरावांचे कुटुंब पुण्याला आले, पुण्यातील शाळेत प्रवेश मिळवला. पुढे त्यांच्या वडिलांची बदली मुंबईला झाली. मुंबईचे वातावरण त्यांच्या प्रकृतीला मानवले नाही. त्यांना मधुमेह झाला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळतच गेली. त्यामुळे घरची परिस्थिती अजुन खालावली. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या आईने शिवणकाम सुरू केले. हणमंत त्यावेळी पुण्याच्या मॉडर्न स्कूल मध्ये शिकत होते. शाळा घरापासून खूप दूर होती, त्यावेळी ते शाळेत पायी जात असत. घर खर्चाची गरज पूर्ण करण्याकरिता त्यांची आई जवळच्याच महानगरपालिकेच्या शाळेत शिकवायला देखील जायच्या. अशा परिस्थितीतही त्यांनी दहावीला ८८% मिळवले.
गायकवाड यांनी पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडला. ते डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अशातूनही त्यांनी डिप्लोमा पूर्ण करून अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना त्यांनी पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या विद्यार्थांच्या शिकवण्या घेणे, घरांना रंग देणे अशी छोटी-मोठी कामे करत स्वतःचा निर्वाह केला. वयाच्या १९ व्या वर्षी हणमंतराव यांनी भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली, या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपाची मदत करायला सुरुवात केली.
१९९४ मध्ये इंजिनियरिंग पूर्ण झाल्यानंतर हणमंतराव गायकवाड यांना टाटा इंजिनियरिंग एंड लोकोमोटिव कंपनी अर्थात टेल्को (सध्याची टाटा मोटर्स) मध्ये पुणे प्रकल्पासाठी पदवीधर शिकाऊ अभियंता म्हणून नोकरी मिळाली.
२२ मे, १९९७ मध्ये, नवीनच सुरू करण्यात आलेल्या इंडिका कारच्या प्लांटसाठीचे कंत्राट भारत विकास प्रतिष्ठानला मिळाले होते. हे भारत विकास प्रतिष्ठानचे पहिले कंत्राट होते आणि त्यांची जबाबदारी हणमंत यांनी त्यांचे जुने मित्र उमेश माने यांच्यावर सोपवली होती. त्यांनी कंपनीचे ‘भारत विकास सर्विसेस’ असे नामकरण केले. विविध ठिकाणी लोकांना आणि संस्थाना विविध सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. साफ-सफाई करणारी अद्ययावत यंत्रणा खरेदी केल्या. ऑफिसेस, भवन, इमारती व मंदीरे इत्यादींच्या स्वछतेच्या कामाची कंत्राटे मोठ्या प्रमाणात चालू केली. त्यांनी या कामाची सुरुवात बेंगळुरू आणि चेन्नई पासून केली.
२००४ मध्ये भारत विकास सर्विसेसला भारतीय संसद भवनाच्या कामाचे कंत्राट मिळाले. पुढे पंतप्रधानांचे निवासस्थान आणि राष्ट्रपती भवनाचे कामही या संस्थेला मिळाले. सरकारी भवन, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानक, विमानतळ, कॉर्पोरेट भवन, मंदिर यासारख्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी या संस्थेवर सोपवण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचे जाळे उभे करण्यात आले आणि त्याला ‘भारत विकास ग्रुप’ असे नाव देण्यात आले. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आळंदी, पंढरपूर आणि तुळजापूरची मंदिरे विनामूल्य साफ करायचे काम स्वीकारले.
भारत विकास ग्रुपने देशाबाहेरही आपल्या सेवा सुरू केल्या. अवघ्या आठ सहकाऱ्यांच्या मदतीने बीव्हीजीचे काम सुरु झाले पण आज मितीला भारत विकास ग्रुपमधील कर्मचाऱ्यांची संख्या १ लाखाहून अधिक आहे, असे हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.
तुम्ही सर्वानी तुमच्या आयुष्यात काय बदल करायचा आणि तुमच्यामुळे लोकांच्या आयुष्यात कोणता बदल होणार आहे याबद्दलचा विचार करा असे सांगून श्री. गायकवाड यांनी आपले स्वप्न देखील सांगितले. पुढच्या दहा वर्षात १० लाख लोकांना रोजगार देणार, १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्यासाठी मदत करायची आणि जी काही संपत्ती मिळेल त्यापैकी कमीतकमी ९० टक्के संपत्ती समाजासाठी खर्च करायची. आपण आपल्या कमावरती फोकस केला तर सगळं व्यवस्थित होईल असं ते शेवटी म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी देखील आपले विचार मांडले. उपस्थित सर्वांचे स्वागत मोहन होडावडेकर यांनी केले. यावेळी कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी, उद्योजक, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन मदने यांनी तर आभार प्रदर्शन ऍड. नकुल पार्सेकर यांनी केले.

error: Content is protected !!