पणदूर येथील युवक पाच महिन्यापासून बेपत्ता

कुडाळ तालुक्यातील पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. पाच महिन्यापासून तो घरी न आल्याने त्याच्या आईने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुनील संभाजी जाधव असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोईसानी दिलेल्या माहिती नुसार, सुनील संभाजी जाधव (२४) राहणार – पणदूर (मूळ राहणार मालगाव, मिरज गुंडेवाडी, जि. सांगली) हा युवक १६ जून २०२५ पासून बेपत्ता आहे. सुनील याला कुणाला काहीही न सांगता घरातून निघून जायची सवय होती. कुणालाही न सांगता तो बाहेरगावी कामानिमित्त जात असे. नेहमीप्रमाणे कामासाठी कुठेतरी बाहेर निघून गेला असेल असे समजून आईने या गोष्टीची कुठेही तक्रार केली नाही. गेल्या ५ महिन्यांपासून सुनील याच्याशी कोणताही संपर्क न झाल्यामुळे त्याच्या आईने आज कुडाळ पोलिस स्थानक गाठत बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांकडून बेपत्ता सुनील याचा शोध सुरू असून कोणालाही याबाबत काही माहिती आढळल्यास त्वरित कुडाळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





