कुडाळमध्ये आढळला दुर्मिळ ‘पट्टेरी पोवळा’ साप

३ फुटांहून अधिक लांबीचा सर्प

सिंधुदुर्गची जैवविविधता पुन्हा अधोरेखित

कुडाळ : तालुक्यातील नारूर (कडावलं रेंज) येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता, ३ फुटांहून अधिक लांबीच्या (सुमारे ९६ सेंमी) एका विषारी सापाचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. सुरुवातीला हा साप ‘कॅस्टोचा पोवळा’ असावा असा अंदाज होता, मात्र सोलापूरच्या सर्प अभ्यासकांनी केलेल्या तपासणीनंतर तो ‘पट्टेरी पोवळा’ (Striped Coral Snake) असल्याचे निश्चित झाले.
कुडाळ वनविभाग रेंजचे RRT प्रमुख अनिल गावडे, प्रसाद गावडे, आणि सहकारी धनंजय मेस्त्री, सुशांत करंगुटकर यांनी हे महत्त्वपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले. वन विभागाला या रेस्क्यूची तातडीने माहिती देण्यात आली. सापाला पकडल्यानंतर तो दुर्मिळ प्रजातीचा वाटल्याने RRT टीमने अधिक माहितीसाठी सोलापूर येथील प्रसिद्ध सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सापाचे फोटो पाठवण्यात आले. सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी फोटोंचे बारकाईने निरीक्षण केले आणि सापाची ओळख पटवली. त्यांनी हा साप कॅस्टोचा पोवळा नसून पट्टेरी पोवळा असल्याचे स्पष्ट केले.
हा साप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेतील मानाचा तुरा असून आपल्या परिसराची समृद्धी दर्शवितो. या सापाला वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव भिसे, वनपाल बालेश न्हावी आणि वनरक्षक गणेश मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
या पूर्वी महेश राऊळ यांनी वेंगुर्ला तुळस येथे कॅस्टोचा पोवळा सापाचा बचाव केला होता. याबाबत माहिती देताना सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे म्हणाले, हा साप कॅस्टोचा पोवळा नसून, तो दुर्मिळ पट्टेरी पोवळा आहे. हे दोन्ही साप विषारी असले तरी, त्यांच्यात रंग आणि नक्षीचा स्पष्ट फरक आहे. कॅस्टोचा पोवळा हा तुलनेने नवीन वर्णित साप असून त्याचे शरीर पूर्णपणे एकरंगी तपकिरी रंगाचे असते आणि त्यावर कोणतेही पट्टे नसतात. तसेच, त्याच्या डोक्यावर एक स्पष्ट पिवळसर नारंगी पट्टी असते आणि पोटाकडील रंग फिक्या नारंगीपासून भडक लाल असतो. याउलट, हा रेस्क्यू झालेला साप (पट्टेरी पोवळा) गडद काळ्या किंवा जांभळट तपकिरी रंगाचा असून त्याच्या शरीरावर तीन ते पाच लांब समांतर पट्टे आहेत, तसेच त्याचे डोके आणि मान काळ्या रंगाची असते आणि पोटाकडील रंग लाल किंवा लालसर-नारंगी असतो. या नक्षीमुळेच हा साप पट्टेरी पोवळा असल्याचे निश्चित होते.
कुडाळ रेंज RRT प्रमुख अनिल गावडे यांनी सांगितले, आम्ही साप पकडला तेव्हा तो पोवळा जातीचा आहे हे निश्चित होते, पण नेमका कोणता हे ओळखणे कठीण होते. सुरुवातीस आम्हाला तो कॅस्टोचा पोवळा असावा असे वाटले, परंतु राहुल शिंदे सरांनी ओळख पटवल्यानंतर आम्हाला या पट्टेरी पोवळा असल्याचे कळले. या सापाची वनविभागात नोंद करून त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे.
कुडाळ रेंज RRT टीम सदस्य प्रसाद गावडे म्हणाले, एवढ्या लांबीचा आणि दुर्मिळ विषारी साप रेस्क्यू करण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे. इतक्या मोठ्या लांबीचा पोवळा सर्प आम्ही पहिल्यांदाच बघितला. सर्प अभ्यासकांच्या मदतीने योग्य ओळख पटल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले.
कोल्हापूरचे सर्पमित्र पप्पू खोत म्हणाले, पट्टेरी पोवळा हा अत्यंत महत्त्वाचा आणि कमी दिसणारा साप आहे. अनिल गावडे आणि प्रसाद गावडे यांनी अत्यंत सावधगिरीने आणि जबाबदारीने हे रेस्क्यू केले. साप पकडल्यावर त्याची योग्य ओळख करून घेणे आणि वन विभागाला माहिती देणे हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

error: Content is protected !!