महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी रविंद्र माणगावे बिनविरोध

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदाचा पदभार रविंद्र माणगावे यांनी नुकताच मुंबई मुख्य कार्यालय येथे स्वीकारला. महाराष्ट्र चेंबर ही राज्याची शिखर संस्था आहे. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दीपक परब, उपाध्यक्ष शंकर शिंदे, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन अंजु सिंघल, कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश अग्रवाल, वेदांशू पाटील, मनीष पाटील, सरकार्यवाह श्रीमती शितल पांचाल, माजी सरकार्यवाह सुरेश घोरपडे, उपसचिव नितीन शेलार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबरमध्ये सदस्य, कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष असा विविध पदांवर कार्य करत आज अध्यक्षपद स्वीकारणारे रविंद्र माणगावे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील सावळवाडी गावचे. सांगली जिल्ह्यातील सावळवाडी या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले रविंद्र माणगावे हे त्यांच्या कुटूंबातील पहिले उद्योजक आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदाचा सांगली जिल्ह्याला पहिल्यांदाच मान मिळाला. रविंद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र चेंबरचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
	




