एसआरएम कॉलेज मध्ये ३० सप्टेंबर पासून विद्यापिठस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

कोकण विभागीय बॅडमिंटन स्पर्धचे आयोजन

तीन जिल्ह्यातून १६६ स्पर्धक सहभागी

कुडाळ : कोकण विभागातील युवक क्रीडापटूंना संधी आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय (विभाग ४) आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांना प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा दिनांक ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. कोकण विभागातून या स्पर्धेत १६६ स्पर्धक सहभागी झाले आहेत अशी माहिती कोकण विभाग क्रीडा समिती सचिव प्रा. चंद्रकांत नाईक आणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे यांनी दिली. महाविद्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय (विभाग ४) आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांना प्राप्त झाले आहे. त्याची माहिती देण्यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यलयात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे, कोकण विभाग क्रीडा समिती सचिव प्रा. चंद्रकांत नाईक, संत राऊळ महाराज महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रकाश मसुरकर, समिती सदस्य प्रा. अजित कानशिडे, प्रा. एस. एस. चव्हाण, प्रा. आर. के. सावंत, प्रा. गीताश्री ठाकूर, प्रा. काजल मातोंडकर, क्रीडा प्रशिक्षक क्रिस्टन रॉड्रिग्ज उपस्थित होते.
प्रभारी प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि क्रीडा वाटचालीविषयी माहिती दिली. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आघाडीवर असून त्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. त्यामुळे संपूर्ण बॅडमिंटन कोर्टची चांगली व्यवस्था असलेल्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाला या कोकण विभाग स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले.
कोकण विभाग क्रीडा समिती सचिव प्रा. चंद्रकांत नाईक यांनी या स्पर्धेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील एकूण ३३ महाविद्यालयांचे १६६ स्पर्धक सहभागी झाली आहेत. त्यामध्ये १०६ मुलगे व ६० मुली आहेत. दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी या स्पर्धकांची नोंदणी होऊन लॉट्स टाकण्यात येणार आहेत. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. १ ऑक्टोबर रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे.
या निमित्ताने संत राऊळ महाराज महाविद्यालयात चांगले क्रीडा वातावरण निर्माण झाले असून, विभागीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडूंना विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. चंद्रकांत नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी यांच्यातर्फे विशेष तयारी करण्यात आली आहे.स्पर्धकांची नोंदणी समाधानकारक झाली असून, या स्पर्धेला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, क्रीडाप्रेमी नागरिक, व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!