शाळा तिथे दाखला उपक्रमा अंतर्गत कणकवली तालुक्यात 4 हजार दाखल्यांचे वितरण

आतापर्यंत 10,000 अर्ज दाखल्यासाठी प्राप्त
तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा तिथे दाखला हा उपक्रम सध्या राबविला जात असून या उपक्रमा अंतर्गत तसेच सेवा पंधरावडा च्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील 258 शाळांमध्ये वय अधिवास व जातीचा दाखला देण्याबाबतची कार्यवाही सध्या सुरू आहे. आतापर्यंत कणकवली तालुक्यात या उपक्रमांतर्गत 10 हजार अर्ज आले आले असून, आतापर्यंत 4 हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आले अशी माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. सेवा पंधरावडा या अंतर्गत प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून शाळा तिथे दाखला हा उपक्रम हाती घेण्यात आला. कणकवली तालुक्याने या उपक्रमात झोकून दिले असून कणकवली तालुक्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याकरिता कणकवली तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र संचालक व सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे तालुक्यातील शाळांचे जबाबदारी सोपविण्यात आली असून, कणकवली तालुक्यातील 20 महा-ई सेवा केंद्र व 1 सेतू सुविधा केंद्र तसेच ग्रामपंचायत स्तरावरील 62 आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत देखील हे दाखले दिले जात आहेत. कणकवली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीनी देखील प्रत्यक्षातही दाखले देण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. प्रति दाखला 100 रुपये यानुसार सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये हे दाखले दिले जात आहेत अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिली.





