आईवडीलांचा मान राखत नितीमुल्ये जपा – संदीप परब

श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार संदिप परब यांना प्रदान

आजी आजोबांना तुमच्या आईवडिलांनी सांभाळले. त्यांनी संस्कार दिले म्हणून तुमचे जीवन सुकर आहे.
पैसा हे माध्यम आहे मूल्य हे जीवन आहे पैशामागे धावताना आपल्या आई वडिल आजी आजोबांची अवहेलना करत नितीमुल्ये विसरू नका असे आवाहन पणदूर येथील सविता आश्रम चे संदिप परब यांनी आचरा येथे केले.
वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा यांच्यातर्फे देण्यात येणारा तिसरा श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार २०२५ हा पणदूर येथील ‘संविता आश्रम’ तसेच मुंबई,पालघर, गोवा येथील अनेक आश्रमांतून गोरगरीबांची सेवासुश्रुषा व आधार देण्याचे महान कार्य करणा-या थोर समाजसेवक संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांना जाहिर झाला होता. त्याचे वितरण वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी चेअरमन मंदार सांबारी, पतसंस्थेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत राणे, अभिजित जोशी, सविताश्रमाचे इतर सहकारी, यांसह पतसंस्थेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मांगल्य मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी पतसंस्थेतर्फे शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

error: Content is protected !!