कुडाळ शहरात आजपासून एकदिशा मार्गाची अंमलबजावणी !
नागरिक तसेच वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे कुडाळ नगरपंचायतीकडून आवाहन
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १७३ नुसार कुडाळ नगरपंचायतीने विशेष सभा ठराव क्र. ०१, दिनांक २२ जून २०२२ नुसार कुडाळ नगरपंचायतीने यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या एकदिशा मार्ग व पार्किंग आणि नो-पार्किंग झोनबाबत चर्चा/विचार विनिमय दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजीच्या सर्वसाधारण सभेत होऊन खालीलप्रमाणे एकदिशा मार्ग ठरविण्यात आलेला आहे. यानुसार, १) गांधी चौक ते ओटवणेकर तिठापर्यंत एकदिशा मार्ग, २) उपरोक्त एकदिशा मार्गावर बुधवारी आठवडा बाजारादिवशी चारचाकी व उच्चश्रेणीच्या वाहनांस प्रवेश निषिध्द ३) उपरोक्त एकदिशा मार्गाच्या दोन्ही बाजूस चारचाकी वाहनास पार्किंग करण्यास मनाई तसेच दोन चाकी वाहनांना पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर पार्किंग करण्यास मनाई ४) अभिमन्यू हॉटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रस्त्याकडेच्या मोकळ्या जागेत सम-विषम पार्किंग अनुज्ञेय असेल. त्यानुसार, कुडाळ नगरपंचायतने नागरिकांचे हित व वाहतुकीची सुलभता विचारात घेऊन आज, २९ मार्च २०२३ रोजीपासून एकदिशा मार्गाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर निर्देशांचे पालन न केल्यास पोलिस कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. तरी याप्रमाणे नागरिक आणि वाहनधारकांनी अंमल करून कुडाळ नगरपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष आफरीन करोल तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांतर्फे करण्यात आले आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ