ग्रामीण भागातील कबड्डी स्पर्धांना प्राधान्य देणार !

आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन

कुडाळमध्ये कबड्डीच्या रणसंग्रामाला शानदार सुरुवात

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आयोजन

कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने निमंत्रितांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला आजपासून कुडाळ क्रीडासंकुल मैदान, कुडाळ तहसीलदार कार्यालयानजिक शानदार सुरुवात झाली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी या कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा देताना आमदार वैभव नाईक यांनी नेहमीच कुडाळ आणि मालवण तालुक्यात क्रीडास्पर्धांना प्राधान्य दिले आहे. या भागात अनेक विकासकामे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालीत. यामुळेच आमदार वैभव नाईक कुडाळ – मालवण मतदारसंघातून पुन्हा हॅटट्रिक साधतील, असा विश्वास व्यक्त केला. कुडाळ आणि मालवण तालुक्यात रस्ते, ब्रिजची सर्वाधिक कामे आमदार वैभव नाईक यांनी पूर्णत्वास आणली. त्यामुळे आमदार कसा असावा याचा आदर्श वैभव नाईक आहेत, असे प्रतिपादन संजय पडते यांनी केले.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, मागील ७ ते ८ वर्षे कबड्डी स्पर्धा कुडाळ-मालवण तालुक्यात होत असून यावर्षी या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वाधिक बक्षिसे घोषित केली आहे. आपल्या भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार वैभव नाईक म्हणाले.
सध्या ग्रामीण भागात सुध्दा कबड्डी स्पर्धा होत असून त्याला सुद्धा प्रोत्साहन दिले जाईल. अशा स्पर्धांच्या माध्यमातून प्रो-कबड्डी स्पर्धेेसाठी खेळाडू तयार होवू शकतात. तसेच या तहसीलदार मैदानावर पुढील काळात होणाऱ्या कबड्डी स्पर्धा मॅटवर होतील, असे आमदार वैभव नाईक यांनी आश्वासित केले. तसेच आपण कुडाळ शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत. आपण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार, असे प्रतिपादन केले.
व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, संघटक श्रेया परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेवक किरण शिंदे, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका अक्षता खटावकर, नगरसेविका ज्योती दळवी, नगरसेवक संतोष शिरसाट, नागेंद्र परब, रुपेश पावस्कर, जयभारत पालव, अतुल बंगे, बबन बोभाटे, राजू गवंडे, संदीप महाडेश्वर, बाबी गुरव, गोट्या चव्हाण, सचिन काळप आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पारितोषिक ३५ हजार रुपये आणि चषक द्वितीय क्रमांक २० हजार रुपये आणि चषक तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी ७ हजार रुपये आणि चषक तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, चढाई आणि पकड, रोख रक्कम आणि चषक अशी पारितोषिके आहेत.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!