खारेपाटण येथे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न…

“बेरोजगारानी स्वयंरोजगारातून आपली प्रगती साधावी…”
—- सौ प्राची ईसवलकर
सरपंच,खारेपाटण

“विशेष करून अनुसूचित जाती प्रवर्गातील गरजवंत बेरोजगार युवक युवती व महिला यांनी सरकारी नोकरीची वाट न पाहता स्वयंरोजगारातून आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधावी..” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग व महाराष्ट्र शासन उद्योजकता विकास केंद्र तसेच संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने बेरोजगार युवक युवती व महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना काढले.
संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या अध्यक्ष सौ संकीता पाटणकर यांचे अध्यक्षतेखाली बुद्धविहार,पंचशील नगर खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा शुभारंभ खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांचे शुभहस्ते डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर,व्यवस्थापक श्री शिंगटे सर,समन्वयक श्रीम.सुषमा साखरे मॅडम,बँकिंग आर्थिक साक्षरता प्रोजेक्ट चे श्री सुभाष राणे, खारेपाटण हायस्कूलच्या शिक्षिका श्रीम.काझी मॅडम,सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर,बचत गटाच्या सी.आर.पी. सौ आस्था पाटणकर,पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे सचिव श्री सागर पोमेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या शिबिराला उपस्थित सर्व मान्यवरांचे संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रकल्प अधिकारी श्री राजेश कांदळगावकर यांनी जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र शासन उद्योजकता विकास केंद्राच्या विविध उद्योग व्यवसाय योजनांची माहिती उपस्थितांना दिली.तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी देखील उपस्थितांना माहिती दिली.या संधीचा लाभ बेरोजगार युवक युवतींनी घेऊन चांगले उद्योजक बना असे आवाहन श्री कांदळगावकर यांनी यावेळी केले.
यावेळी व्यवस्थापक श्री शिंगटे सर,श्री सुभाष राणे यांनी देखील विविध योजनांची माहिती शिबिरातील नागरिकांना दिली.या एकदिवसीय शिबिराला खारेपाटण दशक्रोशोतील महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री संतोष पाटणकर यांनी मानले.

error: Content is protected !!