उत्तुंग ध्येय निश्चित करून उज्वल भवितव्य घडवा

सतीश सावंत यांचे प्रतिपादन

भिरवंडे देवालये संचालक मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव

दहावी, बारावीमध्ये मिळालेल्या गुणांवर समाधान न मानता आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावत उत्तुंग ध्येय निश्चित करा. पुढील काळात ज्या शिक्षणातून आर्थिक समृध्दी आणणार्‍या नोकर्‍या उपलब्ध होतील असे शिक्षण घ्या आणि आपले उज्वल भवितव्य घडवा. आईवडीलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट याची जाणीव ठेवत चांगल्या शिक्षणाबरोबरच चारित्र्यवान माणूस बना आणि आपल्या गावाचे व कुटुंबाचे नाव उज्वल करा, असे प्रतिपादन भिरवंडे देवालये संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
देवालये संचालक मंडळ, भिरवंडेच्यावतीने भिरवंडे गावातील दहावी, बारावीतील उत्तीर्ण आणि विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत मुलांचा सत्कार नुकताच रामेश्वर मंदिराच्या रंगमंचावर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवालये संचालक मडळाचे अध्यक्ष सतीश सावंत हे होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मोहन सावंत, देवालये संचालक मंडळाचे ज्येष्ठ संचालक गणपत सावंत, सचिव तुषार सावंत, संचालक अजित सावंत, सुनील सावंत, संजय सावंत, प्रकाश घाडीगावकर, संदीप सावंत, सुभाष सावंत यांच्यासह भिरवंडेतील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमात देवालये संचालक मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देवून आणि सतीश सावंत यांच्यावतीने विद्यार्थ्यांना रक्तचंदन वृक्षाचे रोप देवून सतीश सावंत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणातून खर्‍या अर्थाने समृध्दी येते याबाबतचे विवेचन करत विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून रोजगाराभिमूख शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. गणपत सावंत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित सावंत यांनी करताना देवालये संचालक मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मंडळाच्यावतीने धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!