अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चिपळुण येथे ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रम संपन्न

माजी आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, रत्नागिरी जिल्हा उत्तर व दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन चिपळुण येथे करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मा. आम. प्रमोद जठार यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि योगदान यावर प्रकाश टाकतांना सांगितले की, “संपूर्ण भारतात भगवान शंकराची मंदिरे उभारून धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता जपणारी, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तब्बल २९-३० वर्षे प्रजेची मायेने सेवा करणारी एक आदर्श प्रशासक होती. नवीन कायदे, रस्ते, घाट, धर्मशाळा यांची उभारणी करून परकीय आक्रमणांच्या खुणा पुसणारी ही राणी, प्रजेच्या सेवेमुळे ‘देवी’, ‘पुण्यश्लोक’, ‘मातोश्री’ अशा उपाधींनी गौरवली गेली.”

त्यांनी असेही सांगितले की, “धनगर समाजातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या या महान महिलेकडून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी. भारतीय जनता पार्टीने अशा महापुरुष आणि महिलांच्या कार्याची आठवण करून देणे, हेच आपले वैशिष्ट्य आहे. ही परंपरा जपण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करावे.”

या कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या वेशभूषेत विशेष सादरीकरण करण्यात आले होते. तसेच ‘युवा प्रेरणा संवाद’ आणि ‘युवती प्रेरणा सन्मान सोहळा’ अशा विशेष उपक्रमांमधून प्रेरणादायी कार्य करणाऱ्या युवतींचा सत्कारही करण्यात आला.

या वेळी रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अतुल गोंदकर, मा. रामदास राणे, वसंत ताम्हणकर, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण तसेच भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!