आचरा पंचक्रोशीत गेले चार दिवस वीज पुरवठा खंडित असून यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय ग्रामस्थांचीही मोठी गैरसोय झाली आहे.

संतप्त बनलेल्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांच्या नेतृत्वाखाली आज येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. येत्या चार दिवसात वीज पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर न केल्यास माजी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक, ग्रामस्थांचा महावितरणवर मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला.
आचरा भागात गेले चार दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने व्यावसायिक, ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. त्यामुळे ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी शहरप्रमुख माणिक राणे, महिला विभाग प्रमुख अनुष्का गावकर, माजी सरपंच चंदन पांगे, चिंदर माजी सरपंच प्रकाश वराडकर उपविभाग प्रमुख अनिल गावकर सचिन रेडकर पळसम उपसरपंच अविराज परब त्रिंबकचे ज्येष्ठ शिवसैनिक संतोष गोरवले नितीन घाडी संजय वायंगणकर दाजी गोलतकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते, महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. मठकर, पोलीस निरीक्षक बी. जी. धुमाळ, श्री. देसाई, श्रीमती आचरेकर, श्री. वैजल आदी उपस्थित होते.
यावेळी आचरा विभाग सांभाळत असताना महावितरण कडे आवश्यक साधनसामुग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे का असा प्रश्न अनुष्का गावकर यांनी उपस्थित केला. केवळ शहरी भाग न बघता ग्रामीण भागावर सुद्धा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे समीर लब्दे यांनी सांगितले. वीज पुरवठा खंडित राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई महावितरण देणार का असा प्रश्न माणिक राणे यांनी उपस्थित केला. वीज पुरवठा संदर्भात अनेक तक्रारी असताना महावितरणचे कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत असे नितीन घाडी यांनी यावेळी सांगितले. महावितरणचे अधिकारी नेहमी तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत आहेत. प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांवर आलेल्या फांद्यांची, झाडांची कटाई करणे आवश्यक असताना ती झाली नसल्याचा पुरावाच अविराज परब यांनी देत अधिकाऱ्यांना निरुत्तर केले.
आजरा पंचक्रोशीतला वीज पुरवठा येत्या चार दिवसात कायमस्वरूपी सुरळीत न झाल्यास महाविकास आघाडी आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. त्याचबरोबर चार दिवसात ग्रामस्थांना योग्य न्याय न मिळाल्यास माजी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्त ग्रामस्थ, व्यापारी यांना घेऊन महावितरणवर मोर्चा काढू असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान यावेळी ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने महावितरणला निवेदन सादर करण्यात आले.





