पालकमंत्र्यांच्या घरी जाणार हा रस्ता त्यांच्याच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बंद !

पालकमंत्री आपल्या ओएसडी ना जाब विचारणार काय?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल

गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या आचरा रस्त्याचे व पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या दुरावस्थेला तत्कालीन कार्यकारी अभियंता व पालकमंत्र्यांचे विद्यमान ओएसडी जबाबदार आहेत. याच कार्यकारी अभियंत्याने आपल्या लाडक्या ठेकेदाराला कामे देत आज नागरिकाना जो त्रास दिला आहे, त्याचा जाब पालकमंत्री आपल्या लाडक्या ओएसडी ला विचारणार का असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

आचरा रस्त्याच्या वरवडे उर्सुला ते पिसेकामतेपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू होऊन दीड वर्ष झाले. या रस्त्याच्या भरावासाठी नदीतील गोटे वापरण्यात आले. जे आज वाहून जात आहेत. याबाबत आम्ही त्याचवेळी तक्रार केली होती. मात्र तत्कालीन कार्यकारी अभियंत्याने ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केले. मात्र तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या कार्यपद्धतीमुळे हा रस्ता आजही अपूर्ण अवस्थेत राहिला. त्यानंतर याच मार्गावरील वरवडे येथील नदी पुलाचे काम पाच महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले. वास्तविक दीड वर्ष चार किमी चे काम करणाऱ्या ठेकेदाराला हे काम देताना विचार करायला हवा होता. परंतु कार्यकारी अभियंत्यांनी त्याच लाडक्या ठेकेदाराला पुन्हा पुलाचे काम दिले. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असताना या कामालाही गांभीर्याने घेण्यात आले नाही. परिणामी अद्यापही अपूर्ण आहे या साऱ्याला तत्कालीन कार्यकारी अभियंता तथा पालकमंत्र्यांचे विद्यमान ओएसडीच जबाबदार आहेत, असे श्री उपरकर यांनी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांच्या घरी जाणार हा रस्ता त्यांच्याच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बंद झाला आहे. या भागातील इतर कामांची हीच अवस्था आहे. आज नागरिकांना चार ते पाच किलोमीटर वळसा मारून जाण्याची वेळ आली. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पर्यायी मार्गाने आज नागरिक जात आहेत त्या मार्गाच्या डांबरीकरणासाठी तीन महिन्यापूर्वी कार्यारंभ आदेश देऊ न काम सुरू झालेले नाही. हे कामही याच लाडक्या ठेकेदाराला देण्यात आल्याची समजते. अशा स्थितीत कार्यकारी अभियंता काय करत होते? असा सवाल श्री उपरकर यांनी केला.
आज अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आचरा मार्ग बंद झाला आहे. पूर्ण पावसाळ्यात कधीतरी एखाद दुसरा दिवस समस्या उद्भवणारा मार्ग अधिकाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळे बंद ठेवण्याची आलेली ही बहुदा पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी आणि या साऱ्याची जबाबदारी पालकमंत्री घेणार का असा सवालही त्यांनी केला आहे.

error: Content is protected !!