कणकवली तालुक्यातील प्रशासकीय विभागानी आपत्तीचा सामना करण्यासाठी 24 तास अलर्ट रहा

कणकवली प्रांताधिकार्‍यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना

कणकवली तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक

आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या. तसेच कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष 10 मे पासून सुरू करण्यात आला असून, कणकवली तालुक्यात कुठेही पावसाळ्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीची घटना उद्भवल्यास 023 67 2 32 025 या क्रमांकावर संपर्क साधावा असे देखील आवाहन श्री कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे. पावसाळ्याच्या कालावधीत वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळल्यास ती तात्काळ हटविण्याकरिता जेसीबी व वुड कटर देखील कार्यरत ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक प्रशासनाच्या विभागाचा या ठिकाणी आढावा घेत प्रांताधिकार्‍ यानी सर्वांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.
कणकवली तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन ची बैठक नुकतीच प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, निवासी नायब तहसीलदार मनोज यादव, सहाय्यक गटविकास अधिकारी मनोज वालावलकर, नगरपंचायत अधिकारी, महामार्ग प्राधिकरणचे उप अभियंता अतुल शिवनिवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता के. के. प्रभू, कणकवली पोलीस, वीज वितरण चे उप कार्यकारी अभियंता विलास बगडे, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी व एसटी चे अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत स्तरावर नदी नाल्यांमध्ये पोहणाऱ्या व्यक्ती यांची यादी तयार ठेवावी. तसेच गावातील रस्ते किंवा घरांवर झाडे कोसळल्यास याकरता लाकूड कटर व जेसीबी याचीही व्यवस्था करून ठेवावी अशा सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. रस्त्यांवर पडलेली झाडे तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबी व लाकूड कटर ची व्यवस्था ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या. वीज वितरण कडून तारांवरची झाडे कटिंग करणे याच सोबत गंजलेले धोकादायक पोल देखील बदलण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. महामार्ग प्राधिकरण कडून महामार्गावर पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करा. कोणत्याही ठिकाणी वाहतूक ठप्प होता नये या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर कणकवली नगरपंचायत क्षेत्रामध्ये शहरातील नालेसफाई तसेच धोकादायक झाडे तोडणे याबाबत कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आले. कणकवली तहसीलदार कार्यालयाकडे लाईफ जॅकेट, लाकूड कटर तसेच आपत्ती काळातील पाण्यामध्ये वापरण्यात येणारी नवीन बोट उपलब्ध असून कणकवली पोलीस प्रशासनाकडे देखील एक बोट कार्यरत आहे. अशी माहिती यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. पाटबंधारे प्रकल्पाचे धरणातील पाणी नदीमध्ये सोडताना त्या भागातील ग्रामपंचायती व कणकवली तालुका प्रशासनाला कळविण्याबाबत पाटबंधारे च्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या कालावधीत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तात्काळ वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरण कडील ठेकेदारांची संख्या वाढवा अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी कणकवली तालुक्यात पाच ठेकेदारांची टीम कार्यरत असून त्यांना त्यांच्याकडील कर्मचारी वर्ग वाढविण्याबाबत सूचना देण्यात येतील असे सांगितले. प्रशासनाच्या सर्व विभागाने पावसाळ्याच्या कालावधीत अलर्ट राहायचे असून जनतेला कोणताही त्रास होत नाही याची काळजी घ्या. अशा देखील सूचना प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिल्या.

error: Content is protected !!