गड नदीपात्रात कणकवली नगरपंचायतीकडून सांडपाणी सोडल्याने कलमठ गावात कृत्रिम पाणीटंचाई

माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक मेस्त्री यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कणकवली तालुक्यातील गड नदीपात्रात कणकवली नगरपंचायतीकडून शहराचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. हे सांडपाणी थेट कलमठ गावाच्या जलसंच उपसा विहिरीच्या ठिकाणी येत असल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून परिसरात दुर्गंधीचा त्रास सुरू आहे.
गड नदी हा नैसर्गिक जलस्रोत असून त्यावर आशिये, सातरल, कासरल आणि वरवडे या गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा आधार आहे. मात्र कणकवली नगरपंचायतीच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे संपूर्ण नदीपात्र प्रदूषित झाले आहे. या प्रकरणी कलमठ ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेकवेळा पत्रव्यवहार केला असून प्रदूषण नियंत्रण महामंडळानेही नगरपंचायतीवर दंडात्मक कारवाई केली आहे.
नुकतेच शिवडाव धरणातून गड नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हेच पाणी कलमठ गावामार्गे वरील चार गावांपर्यंत पोहोचते. मात्र, सद्यस्थितीत हे पाणीही प्रदूषित होत असल्याने जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर कलमठ ग्रामपंचायत सदस्य विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत टंचाई निधीतून नदीपात्रातील जलस्रोताच्या शुद्धीकरणासाठी तरतूद करण्याची मागणी केली आहे. तसेच कणकवली नगरपंचायतीला सांडपाणी थेट नदीत सोडण्यास बंदी घालण्याचे तातडीने आदेश देण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!