आचऱ्याकडे जाणाऱ्या वरवडे रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडलेले

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची टीका
“एकाच घरात संपूर्ण जिल्ह्याची सत्ता असूनही गावाचा रस्ताच रखडलेला, मग जिल्ह्याचा विकास काय होणार?”
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मूळ वरवडे गावातून आचऱ्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले असून, रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून जाणाऱ्या जनतेला त्रास होत आहे. त्याबाबत आता जनतेतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या कामाच्या रखडपट्टीवर जोरदार टीका केली आहे.
सुशांत नाईक यांनी म्हटले की, “एकाच घरात वडील खासदार, भाऊ आमदार आणि स्वतः पालकमंत्री असूनही वरवडे गावातील रस्ता दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. जर स्वतःच्या गावाचा रस्ताच करु शकत नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्याचा विकास कसा करणार?”
या रस्त्याचे काम हे शासनाच्या वार्षिक बजेटमधून, तर पूलाचे काम नाबार्डच्या निधीतून मंजूर झालेले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनीही शिफारस केलेली होती. तरीही या मार्गाचे काम पूर्णत्वाला गेले नाही. रस्त्याची सद्यस्थिती अशी आहे की, काम अर्धवट असल्यामुळे पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीचा त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर काम सुरू असताना आवश्यक त्या सुरक्षिततेच्या आणि सुविधा पुरविण्याच्या निकषांचे पालन होत नसल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पाण्याची उडती धूळ, खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. याशिवाय वरवडे गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची देखील दुरवस्था असून, त्याची दखल आजवर कोणीही घेतलेली नाही.
युवासेना जिल्हाप्रमुख नाईक यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर लवकरच वरवडे गावाचा रस्ता पूर्ण करण्यात आला नाही, तर शिवसेना सार्वजनिक बांधकाम विभागास जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. तसेच आचऱ्याच्या बायपास रस्त्याचे काम देखील अनेक वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदाराला निधी देऊनही काम रखडल्याचे अनेक पुरावे असून, पालकमंत्री स्वतः त्या ठेकेदाराला पाठीशी घालतात, असा आरोपही त्यांनी केला.”
या प्रश्नावर स्थानिक जनतेतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, ‘विकासाच्या नावाने राजकारण करणारे स्वतःच्या गावाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आहेत,’ अशी टीका नागरिक करत आहेत. आता या रखडलेल्या कामांना गती देऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेना आणि पंचक्रोशीतील नागरिकांकडून जोर धरत आहे असेही सुशांत नाईक यांनी म्हटले आहे.