सावडाव महिला अत्याचार प्रकरणी तपासासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करा!

संशयित आरोपींना जमीन मिळण्यासाठी पोलिसांकडून मुभा दिली जात असल्याचा आरोप
ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांनी वेधले पोलिस अधीक्षकांचे लक्ष
कणकवली तालुक्यातील मौजे सावडाव येथील नयना सावंत व वैभव सावंत या दोन व्यक्ती माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करतात. त्यानुषंगाने सावडाव ग्रामपंचायत संदर्भात स्ट्रीट लाईट व रस्त्याच्या कामामध्ये जो भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे हा भ्रष्टाचार नयना सावंत व वैभव सावंत यांनी माहितीच्या अधिकारात उघड केला. याचा रागातून सावडावचे माजी सरपंच दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नयना सावंत व वैभव सावंत यांना अमानुषपणे मारहाण केली व नयना सावंत यांच्या अंगावरील जॅकेट जबरदस्तीने काढले व जॅकेटच्या आत असलेले टी शर्ट काढण्याचा प्रयत्न करत अश्लील लज्जास्पद शिव्या देत जबर जीविताला धोका होईल अशी मारहाण केली आहे. या मारहाणीमुळे आज ही नयना सावंत व वैभव सावंत हे ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र अमानुष मारहाण व विनयभंगाचा गुन्हा घडूनही अद्यापपर्यंत कणकवली पोलिसांनी या आरोपीविरुद्ध कलम ३०७ दाखल करून कारवाई केलेली नाही. या आरोपीना कोर्टातून जामीन मिळविण्यासाठी मुभा मिळावी याकरिता कणकवली पोलीस सहकार्य करीत असल्याचे दिसून येत. अशा प्रकारचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. नियमबाह्य पद्धतीने काम करण्यासाठी माजी सरपंच दत्ताराम काटे व त्यांचे सहकारी गावात दहशत निर्माण करीत आहेत, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस पाठीशी घालत आहेत हे दुर्दैवी आहे.
तरी सावडाव येथील नयना सावंत व वैभव सावंत यांना अमानुष मारहाण व विनयभंगाच्या गुन्ह्यात आपण स्वतः गांभीर्याने लक्ष घालून संबंधित आरोपींवर कलम ३०७ दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत तसेच सदर तपास कामासाठी महिला पोलीस अधिकारी यांची हि नेमणूक करण्यात यावी अशी मागणी महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव व तालुका संघटक माधवी दळवी यांनी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.